मुरादपूर ते निवेखुर्द रस्त्याच्या कामाला होणार सुरूवात

| चिपळूण । वार्ताहर ।

लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या स्वयंभू श्री क्षेत्र मार्लेश्‍वर देवस्थानकडे जाणार्‍या रस्त्याची सध्यस्थितीला अक्षरशः दुर्दशा झाली आहे. या मार्गावरील मुरादपूर ते निवेखुर्द या रस्त्याची तर पुर्णपणे दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्याचे त्वरीत डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी वाहनचालक व भाविकांमधून वारंवार करण्यात येत होती. अखेर या रस्त्याच्या डांबरीकरण कामाला लवकरच सुरूवात होणार आहे. यासाठी चिपळुण-संगमेश्‍वरचे आ. शेखर निकम यांच्या माध्यमातून भरीव निधी मंजूर झाला आहे.

देवरूखपासून सुमारे 18 किमी अंतरावर सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत निसर्गरम्य ठिकाणी एका गुहेमध्ये स्वयंभू मार्लेश्‍वर देवस्थान वसले आहे. हे देवस्थान निसर्गरम्य ठिकाणी वसलेले असल्यामुळे मार्लेश्‍वराचे दर्शन घेण्यासाठी व येथील निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी राज्याच्या कानाकोपर्‍यातून दरदिवशी हजारो भाविक मार्लेश्‍वर तीर्थक्षेत्री येत असतात. हे भाविक मार्लेश्‍वराचे दर्शन घेवून धन्य होतात. मात्र सध्यस्थितीला मार्लेश्‍वर देवस्थानकडे जाणार्‍या रस्त्याची दुरवस्था झाली असून जागोजागी डांबरीकरण उखडले असून मोठमोठे खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी तर रस्त्याची चाळण झाली आहे. यामुळे भाविकांमधून नाराजीचे सूर उमटत आहेत. लवकरच मुरादपूर ते निवेखुर्द या रस्त्याच्या डांबरीकरण कामाला सुरूवात होणार आहे.

Exit mobile version