नेरळ येथील खुनाचा पर्दाफाश

| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ पोलीस ठाण्याचे हद्दीत 28 मे रोजी नेरळ- कळंब राज्यमार्ग रस्त्यावर 22-25 वयोगटातील जळालेला मृतदेह आढळून आला होता. त्या खुनाचा उलगडा करण्यात नेरळ पोलिसांना यश आले असून,या प्रकरणी दोघा आरोपांना अटक करण्यात आली आहे.पैशांच्या देवघेवीवरुन कर्जत च्या मुद्रे नाना मास्तर नगर भागातील हरेश लोट याचा खून करण्यात आला होता.


मृतदेहाच्या शरीरावरील अवयव यांची रचना बघता तो तरुण 25 वर्षे वयोगटातील मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी रायगड पोलिसांपुढे आव्हान होते. त्या मृतदेहाच्या अंगावर असलेल्या कपड्यांवरून नेरळ पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने सुतावरून स्वर्ग गाठत आरोपीपर्यंत झेप घेतली. जळालेला मृतदेह कर्जत शहरातील मुद्रे नाना मास्तर नगर भागातील बदली गाडी चालक याचा असल्याचे निष्पन्न झाले होते. पोलिसांच्या पथकाला माहिती मिळाल्यांनतर कर्जत पोलीस ठाणे येथे 16 जून रोजी हरेश पांडुरंग लोट हा तरुण हरवलेला आहे अशी तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने 24 जून रोजी खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी यांना ताब्यात घेतले.


कर्जतच्या मुद्रे नाना मास्तर नगर भागातील हरेश लोट हा बदली ड्रायव्हर म्हणून काम करीत होता. तो तेथे आपल्या आईसोबत राहत होता आणि त्याची आई मुकी असल्याने त्यांच्या मुलाबद्दल मृत्यूची माहिती मिळण्यास उशीर झाला. मात्र कर्जतच्या डी मार्ट मधून खरेदी केलेल्या कपड्यांमुळे तपास कामात यश आले. हरेश हा मुद्रे गावातील रहिवाशी असल्याने गावाच्या वेशीवर भंगार विक्रेता असलेल्या दिनेश राममिलन केवट आणि भंगार विक्री बरोबर मॅकेनिक म्हणून दुकान चालविणारा मोहमद अहमद हुसेन यांच्याकडे भंगार व्यवसाययाबद्दल सारखी पैशाची मागणी करीत असे. ते दोघे देखील त्याला काही पैसे देत होते आणि 28 मे रोजी दिनेश केवट आणि मोहमद यांची दारूच्या नशेत असलेल्या हरेश लोट बरोबर झटपट झाली. त्यावेळी हरेशचा गळा दाबून मारण्याचा प्रयत्न झाला आणि शेवटी दिनेश केवट याने दुकानातील हत्यार डोक्यात घालून ठार मारले. रात्री साडेबाराच्या सुमारास त्यांच्या मॅकेनिक दुकानात रिपेअरिंगसाठी असलेली गाडीमध्ये भरून हरेश लोटचा मृतदेह कर्जत- मुरबाड मार्गाने जात कळंब- नेरळ रस्त्यावर ओसाड जागेत नेला. तेथे त्या मृतदेहच्या अंगावर पेट्रोल टाकून आणि आजूबाजूला असलेले गवत गोळा करून टाकले आणि त्या मृतदेहाला नष्ट करण्याच्या इराद्याने आग लावून तेथून पळ काढून पुन्हा कर्जत गाठले होते.

आरोपींना पोलीस कोठडी
हरेश लोट याचा मृतदेह जाळून नष्ट करणारे आरोपी कर्जत येथे सध्या मुक्काम असलेले आणि सिद्धार्थनगर उत्तरप्रदेश येथील मूळ रहिवाशी दिनेश केवट आणि मोहमद अहमद हुसेन या दोघांना न्यायालयाने 28 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Exit mobile version