| ठाणे | प्रतिनिधी |
लग्नात नाचताना धक्का लागल्याच्या रागातून 21 वर्षीय तरुणाचा चाकूने भोसकून हत्या करत त्याचा मृतदेह नदी पात्रात फेकल्याची घटना समोर आली आहे. या तरुणाची हत्या करणारे दोनही आरोपी हे अल्पवयीन आहेत. ही घटना शहापूर तालुक्यातील काजगाव हद्दीत घडली. याप्रकरणी शहापूर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळू वाघ (21), रा. काजगाव शहापूर असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. दोनही अल्पवयीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत बाळू वाघ हा शहापूर तालुक्यातील काजगावमध्ये कुटुंबासह राहत होता. तो उदरनिर्वाहासाठी याच गावात ट्रॅक्टर चालक म्हणून कार्यरत होता. पोलिसांनी ताब्यात घेतले दोन्ही आरोपी 17 वर्षीय विधिसंघर्ष बालकही याच गावात राहतात. शहापूर तालुक्यातील काजगाव हद्दीत 25 मार्च रोजी लग्न होते. याच लग्नात बाळू हा नाचत असताना त्याचा धक्का 17 वर्षीय मुलाला लागला. यावरून त्यांचा वाद झाला. त्यानंतर या दोन्ही अल्पवयीन मुलांनी त्या तरुणाला निर्जनस्थळी गाठून त्याच्यावर चाकूने वार करत हत्या केली. नंतर त्याचा मृतदेह भातसा नदी पात्रात फेकून दिला आणि घटनास्थळावरून पळून गेले.
दरम्यान, शहापूर तालुक्यातील कासगावजवळील पावर हाऊस वज्र प्रकल्पातील नदी पात्रात 26 मार्च रोजी दुपारच्या सुमारास एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह तरंगतांना दिसून आला. या घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जीवरक्षक पथकातील सदस्यांच्या सहकार्याने त्यांनी मृतदेह नदी पात्रातून बाहेर काढला. मृतदेह शवविच्छदनासाठी शहापूर उपजिल्हा रूग्णालयात रवाना केला. त्यानंतर बाळू वाघ यांची हत्या झाल्याचे शवविच्छदनाच्या अहवालातून समोर येताच शहापूर पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध सुरू केला असता या गुन्हयातील 17 वर्षीय अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले. या दोन्ही मुलांना न्यायालयात हजर केले असता त्यांची रवानगी भिवंडीतील बालसुधार गृहात करण्यात आली.