जंगलात निर्जनस्थळी सापडला मृतदेह
। माणगाव । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात एक धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. एका पंधरा वर्षीय मुलीची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह जंगलात फेकून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेने माणगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
माणगाव तालुक्यातील पळसगाव ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या घरोशीवाडी येथे उतेकर कुटुंबीय उन्हाळी सुट्टीनिमित्त आले आहेत. त्यांची पंधरा वर्षीय मुलगी निधी ही सोमवारी (दि.25) मे रोजी रात्री नऊच्या सुमारास वडीलांच्या मोबाईलवर बोलत घरातून बाहेर पडली. ती परत घरी परतलीच नाही. सोमवार रात्रीपासून तिचा तपास सुरू होता. त्यानंतर बुधवारी (दि.27) घरोशीवाडीच्या जंगलात एका मुलीचा मृतदेह सापडल्याचे समजले. त्यानुसार निधीच्या वडिलांना बोलावण्यात आले आणि हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
निधी राकेश उतेकर ही आपल्या कुटुंबासोबत विलेपार्ले येथे राहत होती. ती इयत्ता 9 वी पास होऊन उन्हाळी सुट्ट्या पडल्यामुळे आठ दिवसांपूर्वी आई, वडील आणि भावासोबत गावी आली होती.
जंगलभागात निर्जनस्थळी निधीचा मृतदेह सापडला. प्राथमिक तपासात तिच्या अंगावर झालेल्या जखमा पाहता ही हत्या असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तसेच फॉरेन्सिक टीम व श्वानपथकदेखील घटनास्थळी पोहचले असून माणगाव पोलीस सखोल तपास करत आहेत. माणगाव उपजिल्हा रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आला असून शवविच्छेदनानंतर अधिक गोष्टींचा खुलासा होऊ शकतो.
