| गोवे-कोलाड | वार्ताहर |
रोहा तालुक्यातील कोलाडपासून पाच किलोमीटर अंतरावर असणार्या मढाली (पुगाव) आदिवासी वाडीतील, ता. रोहा एका 35 वर्षीय महिलेच्या मांडीवर, पोटावर, गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करुन तिचा निर्दयपणे खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेची तात्काळ दखल घेऊन कोलाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार उपनिरीक्षक ए.एल. घायवट यांनी तीन पथके तयार करून सहा तासांच्या आत आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मयत रेवती नितीन पवार (35) 14 फेब्रुवारी रोजी शौचास जाते असे घरात आईला सांगून गेली होती. ती घरी आलीच नाही. त्यामुळे इतरत्र शोध घेतला असता सदर महिलेचे प्रेत मढाली गावच्या हद्दीत आढळले. पोलिसांना माहिती मिळताच अवघ्या सहा तासात आरोपी दिनेश भिवा जाधव (38) रा. पुई आदिवासीवाडी, ता. रोहा याच्या मुसक्या आवळल्या. याबाबत कोलाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ए.एल. घायवट व कोलाड पोलीस पथक करीत आहेत.