काशीद येथे अज्ञात व्यक्तीचा खून

। आगरदांडा । प्रतिनिधी ।
काशीद येथील रत्नाकर महाबळ रॉय यांच्या मालकीच्या मिळकतीत एका विहिरी मध्ये 40 वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. याबाबतची प्रथम माहिती काशीद गावच्या पोलीस पाटील समृध्दी राणे यांनी मुरुड पोलिसांना देताच मुरुड पोलीस काशीद येथे पोहचून सदरचा मृतदेह विहिरीतून काढण्यात येऊन त्याचे शव विच्छेदन करण्यासाठी मुरुड ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.


सदरची विहीर काशीद गावापासून दूर व एकांतात आहे. या ठिकाणी अनेक पर्यटक येत असून आलेल्या मित्रांमध्ये भांडण झाले असावे, अथवा सदरील इसमाचा काटा काढण्यासाठी गोड बोलून त्याला या ठिकाणी आणले असावे, व त्याचा खून करण्यात आला असावा अशा अनेक शंका येथे व्यक्त करण्यात येत आहे. मृतदेहाच्या डोक्यावर गंभीर प्रहार मारल्याने मोठी जखम झाल्याचे दिसून येत आहे. तसेच त्याच्या गळ्यामध्ये सिमेंट काँक्रिटचा पोल बांधण्यात येऊन त्याला या विहिरीत टाकून देण्यात आले होते. सदरील इसमाचा खून करण्यात आल्याचे दिसून आल्याने मुरुड पोलिसांनी अज्ञात इस्मानवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक नितीन गवारे करीत आहे.

Exit mobile version