। मुरुड जंजिरा । सुधीर नाझरे ।
मुरुड व काशीद समुद्रकिनारी नाताळ सुट्टी असल्याने पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील पिसोली येथील महात्मा ज्योतिराव हायस्कूल येथील शाळेचा 11 जणांचा समूह काशीद समुद्रकिनारी फिरण्यास आला होता. यामध्ये शिक्षकांसह मुख्याध्यापकदेखील होते. यातील बहुतेक लोक काशीद समुद्र किनारी पोहण्यासाठी उतरले. पोहता-पोहता या शाळेचे मुख्याध्यापक धर्मेंद्र देशमुख (56) हे खोलवर पाण्यात खेचले गेले. ते बराच वेळ पाण्याखाली राहिले. त्यांना जीवरक्षकाने तातडीने पाण्याबाहेर काढले. त्यानंतर बोर्ली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथून अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पर्यटनासाठी आलेल्या शिक्षकांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून या घटनेचा अधिक तपास मुरुड पोलीस करीत आहेत.