१२ तासाच्या आत माणगाव पोलिसांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
माणगाव | प्रतिनिधी |
माणगांव शहराच्या मध्यभागी असलेल्या कालव्यामध्ये दि. २५ फेब्रुवारी रोजी सापडलेल्या मृतदेहाचा खून झाल्याचे स्पष्ट झाले असून पत्नीच्या अनैतिक संबंधातून प्रियकरानेच खून केला असल्याचा संशय माणगांव पोलिसांनी व्यक्त केला आहे.
सविस्तर वृत्त असे की, वाकडाई मंदिराकडे जाणाऱ्या उतेखोल गावच्या पुलाखालील परिसरात दि. २५ फेब्रुवारी रोजी एक पुरुष जातीचा मृतदेह तरंगत वाहून जाताना नागरिकांनी पाहिला. माणगांव पोलिसांना याची खबर मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविण पाटील, पो. नि. राजेंद्र पाटील व पो. शि. शाम शिंदे यांनी घटनास्थळी ताबडतोब धाव घेऊन मिसिंग तक्रारींवर भर देत सूत्रांकडून मृतदेहाची ओळख पटवून घेतली. सदर मृतदेह हा माणगांवमधील महेंद्र भरत जाधव वय ३६, वर्ष रा. साईनगर याचा असल्याचे उघड झाले. महेंद्र जाधवच्या मृत्यूचे कारण उलगडण्याकरिता माणगाव पोलिसांनी ताबडतोब तपासाची सूत्रे वेगाने हलवित १२ तासाच्या आत मयत महेंद्र भरत जाधव यांच्या मारेकऱ्याला पकडले असून मयताच्या पत्नीच्या अनैतिक संबंधातून हा खून झाला असल्याचे पोलिसांनी दिलेल्या प्रेस नोटमध्ये म्हंटले आहे.
मयत महेंद्र जाधव हे समतानगर येथील साई मंदिरात पूजा करण्यासाठी जात असताना वाकडाई नगर येथील कालवा रोडवरील पुलाजवळ आले. त्यावेळी संशयित आरोपी संदिप नामदेव गायकवाड याने मयत महेंद्र यास एकटा गाठून मयत यांच्या पत्नी सोबत असलेल्या अनैतिक संबधाबाबत मयत हे वेळोवेळी संदिप यास समजविण्याचा प्रयन्त करीत होते. त्याचाच राग धरून संशयित आरोपी संदिप याने मयत महेंद्र यास रोडवे ढकलून त्यानंतर त्याला कालव्याच्या पाण्यात ढकलून जीवे ठार मारले असा संशय आहे. म्हणून माणगांव पोलीस ठाणे ठाणे येथे ४३/२०२२ भा. दं. वि. सं. क. ३०२ प्रमाणे नोंद करण्यात आला आहे.
सदरचा गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी पोलीस अधीक्षक रायगड अलिबाग अशोक दुधे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्यातील संशयित आरोपी संदिप नामदेव गायकवाड, रा. उतखोलवाडी माणगांव याचा माणगांव हद्दीत शोध घेण्यास सुरुवात केली. निजामपूर, रवाळजे आणि इंदापूर पोलीस दुरक्षेत्रामध्ये तात्काळ नाकाबंदी लावून पोलीस टीम रवाना करण्यात आल्या. संशयित आरोपी यास अटक करण्यात आली. सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पो. उपनिरीक्षक अस्मिता पाटील या करीत असून या गुन्ह्यातील संशयित आरोपी याचा तपास घेण्याकरीता पो. उपनिरीक्षक समद बेग, सहा. फौ. जितेंद्र वाटवे, लालासाहेब तोरवे, पो. ह. रावसाहेब कोळेकर, प्रशांत पाटील, पो. ना. प्रफुल पवार, मिलिंद खिरीट, म. पो. ना. कुंजन जाधव, पो. शि. शाम शिंदे, भरत तांदळे, गोविंद तलवारे, मयूर पाटील, रामनाथ डोईफोडे, विनय पाटील, शिवाजी मिसाळ, प्रविण माटे यांनी कामगिरी पार पाडली.