धक्कादायक! अनैतिक संबंधाच्या संशयातून प्रेयसीची हत्या

| पनवेल | वार्ताहर |

प्रेयसीचे दुसर्‍यासोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून 22 वर्षीय प्रेयसीवर धारदार शस्त्राने वार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना नवीन पनवेल सेक्टर 18 मध्ये घडल्याचे समोर आले आहे. प्रेयसीवर हल्ला केल्यानंतर प्रियकराने स्वतःवर वार करून स्वतःलादेखील संपवण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी खांदेश्‍वर पोलीस ठाण्यात आरोपी प्रियकराविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की, जागृती हरेश सत्वे (22) रा. नवीन पनवेल, सेक्टर 18 असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. जागृती ही तिच्या कुटुंबासोबत नवीन पनवेल, सेक्टर 18 येथे राहात होती. जागृती हिचे निलेश सुधाकर शिंदे (25) रा. देवगाव, ठाणे याच्यासोबत प्रेमसंबंध होते. गेल्या तीन महिन्यांपूर्वी दोघांच्या प्रेमसंबंधात तणाव निर्माण झाला होता. त्यांचा ब्रेकअपदेखील झाला होता. मात्र, यानंतरदेखील दोघांमध्ये वारंवार वाद होऊ लागले होते. आपल्या प्रेयसीचे दुसर्‍या मुलासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय निलेश याच्या डोक्यात वारंवार येत होता. या गोष्टीचा राग मनात धरून निलेशने 31 जानेवारी रोजी प्रेयसीचे घर गाठले आणि जागृतीला शिवीगाळ करत तू दुसर्‍यासोबत प्रेमसंबंध ठेवू नको असे बोलून तिला मारहाण केली. त्यानंतर संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास तिच्या घरी जाऊन मारहाण करत तिच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करत तिला ठार केले. त्यानंतर निलेशने स्वतःला संपवण्यासाठी स्वतःवरदेखील वार केले. यावेळी जागृतीची आई आणि बहीणही घरी होती. अतिरक्तस्राव झाल्याने जागृती जागेवर मृत पावली आणि निलेशला उपचारासाठी कामोठे एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. याप्रकरणी खांदेश्‍वर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Exit mobile version