| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील देवपाडा गावातील सचिन दत्तू मुरबे या तरुणाचा खून पत्नीचे आपल्या प्रियकराच्या मदतीने केला. त्याचा मृतदेह अनोळखी ठिकाणी घनदाट जंगलात जमिनीमध्ये पुरून ठेवत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
सचिन दत्तू मुरबे हा तरुण 16 जुलै रोजी घरातून हरवला असल्याची तक्रार नेरळ पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. मुरबे यांच्या कुटुंबियांनी आपल्या मुलाचा घातपात झाला असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांना सांगितले होते. त्यामुळे पोलिसांनी त्या दृष्टीने तपास सुरु केला होता. नेरळ गुन्हे प्रकाटीकरण विभागाचे पथकाने देवपाडा गावात सर्व सोर्स वापरले आणि सचिन मुरबे हा हरवला असला तरी त्यामागे घातपात असल्याचे आढळून आले होते. पोलिसांनी त्याच गावातील ऋषिकेश नामदेव तुपे या तरुणाला 21 जुलै रोजी ताब्यात घेतले आणि सचिन मुरबे यांच्या घातपाताचा माग लागला. त्यावेळी त्याने जंगलात त्याचा मृतदेह पुरल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी सचिन मुरबे याचा मृतदेह शोधून तो शव विच्छेदनासाठी मुंबई येथील सर जे जे रुग्णालयात पाठवून दिला. मात्र या प्रकाराने परिसरात मोठी खळबळ माजली आहे.
सचिन मुरबे यांची पत्नी गावातील असल्याने त्यांच्या पत्नीचे गावातील तरुणांबरोबर विवाहबाह्य संबंध असल्याचा कारणावरून हा खून झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांनी ऋषिकेश नामदेव तुपे आणि अरुणा सचिन मुरबे यांना ताब्यात घेतले आहे. पुढील चौकशी करीत आहेत. जिल्हा पोलीस उप अधीक्षक विजय लगारे पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत शिंदे करीत आहेत.