| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
आजारपणाला कंटाळून सख्ख्या भावानेच नायलॉनच्या रस्सीने गळा आवळून भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना खांदा कॉलनीत घडली. याप्रकरणी राहुल भगवान सणस (45) याच्याविरोधात 5 नोव्हेंबर रोजी खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहन भगवान सणस असे मृत भावाचे नाव आहे. राहुल सणस हा ओम वैभव सोसायटी, सेक्टर 7, खांदा कॉलनी येथे राहतो. त्याचा भाऊ रोहन हा गेल्या काही महिन्यांपासून आजारी होता. त्याच्या आजारपणाला कंटाळून राहुलने 4 ऑक्टोबर रोजी राहत्या घरी नायलॉनच्या रस्सीने रोहनचा गळा आवळून हत्या केल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर हा घातपात असल्याचे स्पष्ट झाल्याने राहुल सणस याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला.
सख्ख्या भावाची गळा आवळून हत्या
