। महाड । प्रतिनिधी ।
महाड एमआयडीसी परिसरात रस्त्यावर ट्रक उभा करण्याच्या वादातून एका ट्रक क्लिनरची हत्या करण्यातआली असल्याची घटना बुधवारी ( दि.4) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. दोन ट्रक चालकांमध्ये झालेल्या वादावादीतून ही घटना घडली असून खून करणार्या ट्रक चालकाला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्या झालेल्या क्लिनरचे नाव सौरभ रामदास बिंद (वय 19, रा.उत्तर प्रदेश) असे आहे. महाड औद्योगिक क्षेत्रांमधील इंडियन डिटर्जंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या गेटसमोर ट्रक चालक अंगद धर्मराज बिंद यांच्या ट्रकचा क्लीनर सौरभ बिंद आणि इंद्रजीत रामखेलावन पटेल (रा. उत्तर प्रदेश ) यांच्यामध्ये बुधवारी रात्री साडेआठ वाजता ट्रक उभा करण्यावरून भांडणे झाली होती. या भांडणाचा राग मनात धरून इंद्रजित पटेल याने रात्री साडेदहाच्या सुमारास सौरभ बिंद याच्यावर चाकू व व्हील पाना घेऊन हल्ला केला. इंद्रजीत याने सौरभ याच्या मानेमध्ये चाकू खुपसून त्याला ठार मारले.
महाड औद्योगिक क्षेत्रातील पोलिसांना ही घटना कळताच, पोलीस निरीक्षक मारुती आंधळे व त्यांच्या पथकाने परिसरांमध्ये तपास घेतला. तसेच फरार झालेल्या इंद्रजित पटेल याला ताब्यात घेतले. याप्रकरणी आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस अधीक्षक निलेश तांबे अधिक तपास करत आहे.







