। कोल्हापूर । प्रतिनिधी ।
कोल्हापूर जिल्ह्यात आपल्या अल्पवयीन मुलाच्या मदतीने पत्नीची हत्या केली आहे. या प्रकरणी आरोपी परशराम लोकरे आणि त्यांचा अल्पवयीन मुलगा यांना मुरगूड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील मुरगूड येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. एका माध्यमिक शिक्षकाने कौटुंबिक वादातून प्राध्यापिका असलेल्या आपल्या पत्नीचा डोक्यात मुलाच्या मदतीने वरवंटा घालून हत्या केली. गेल्या काही दिवसांपासून परशराम आणि त्यांच्या पत्नी सविता यांच्यामध्ये वारंवार कौटुंबिक कारणातून वाद होत होते. मंगळवारी (दि. 01) सकाळी दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद सुरू झाला आणि हा वाद विकोपाला गेला. काही वेळानंतर सविता घराच्या बाजूस भांडी घासण्यासाठी गेल्या असता परशराम तेथे पोहोचले. दरम्यान, सोबत अल्पवयीन मुलगाही बरोबर होता. यावेळी मुलाने आपल्या आईचे हात धरले आणि परशराम यांनी जवळच असणारा वरवंटा घेऊन पत्नी सविता यांच्या डोक्यात घालत त्यांची हत्या केली.
घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी हजर झाले. या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून परशराम आणि त्यांच्या अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.