चुलत भावानेच केली हत्या; आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात हजर

| पनवेल | प्रतिनिधी |
जुन्या वादातून सख्ख्या चुलत भावानेच शुक्रवारी (दि.22) दुपारी भावाची कोयत्याने हत्या केल्याची घटना पनवेल तालुक्यातील चिखले गावाच्या हद्दीत घडली. सदर हत्येनंतर आरोपी स्वतः पनवेल तालुका पोलीस ठाण्यात हजर झाला आहे.

चिखले गावात आनंद धनाजी पाटील (32) हा राहतो. तर त्याचा सख्खा चुलत भाऊ भरत पांडुरंग पाटील (42) हा सुद्धा याच गावात राहतो. त्याचा रिक्षा चालविण्याचा धंदा आहे. त्यांच्यात जुने वाद होते. रिक्षा घेवून भरत पाटील चिखले गावाच्या हद्दीत आले असता तेथील डेअरी समोरील डांबरी रोडवरील तलावाजवळ या दोघांमध्ये बाचाबाची झाली.

वाद विकोपाला जाऊन आरोपी भरत पाटील याने त्याच्या हातातील लोखंडी कोयत्याने आनंद पाटील याच्या मानेवर, गळ्यावर, चेहऱ्यावर व हातावर वार करून त्याची हत्या केली. त्यानंतर ते स्वतः पनवेल तालुका पोलीस ठाण्यात हजर झाले व या घटनेची माहिती पोलिसांना दिली. याबाबतची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील, पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर व पथकाने आवश्यक ती पुढील पुर्तता करून आरोपीला ताब्यात घेतले.

Exit mobile version