| पनवेल | वार्ताहर |
चोरीच्या आरोपावरुन गाळामालक आणि त्याच्या दोन कर्मचाऱ्यांनी दोघांना लाथाबुक्यांसह स्टम्पच्या सहाय्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना खारघर येथे घडली आहे. याप्रकरणी खारघर पोलिसांनी तिघांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या आणखी एका आरोपीचा शोध खारघर पोलीस करीत आहेत.
खारघर सेक्टर 12 मधील ओम शांती निवास इमारतील गाळा मालक दिनकर लावंड आणि त्याच्याकडे काम करणारे अभिमन्यू यादव, राजकुमार यादव या तिघांनी चोरीच्या आरोपावरुन विनोद राठोड (35) आणि त्याचा मित्र अनिल जाधव (26) या दोघांना कारमधून खारघर सेक्टर 12 येथील आपल्या गाळ्यामध्ये नेले. त्यानंतर या तिघांनी दोघांना लाथाबुक्यांसह स्टम्पच्या सहाय्याने बेदम मारहाण केली.
यावेळी त्यांनी विनोद राठोड याला जोरात भिंतीवर ढकलून दिल्याने तो जागीच बेशुध्द होऊन मयत झाला. विनोदला त्याच्या नातेवाईकांनी रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी त्याचा आधीच मृत्यू झाल्याचे घोषित केले. त्यानंतर खारघर पोलिसांनी दिनकर लावंड, अभिमन्यू यादव, राजकुमार यादव या तिघांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे. या गुन्ह्यात सहभागी असलेला आणखी एक आरोपी गुलाब चव्हाण उर्फ पिंटू चव्हाण याचा शोध पोलीस घेत आहेत.