मुरूड आगाराचे भारमान घटले; पूलदुरुस्तीचा मोठा फटका

80 वरुन 35 टक्क्यांवर घट; दहा मुंबई फेर्‍या अलिबागकडे वर्ग

| मुरूड जंजिरा | वार्ताहर |

रेवदंडा ते साळाव या अत्यंत महत्त्वाच्या पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने मुरूड आगाराकडून अलिबाग-मुंबईकडे जाणारी थेट प्रवासी वाहतूक बंद पडली आहे. यामुळे प्रवाशांना अलिबागकडे जाण्यासाठी मोठा आर्थिक भुर्दंड आणि मनस्ताप सहन करावा लागत आहे. एसटी आगाराचे उत्पन्न, भारमान सुमारे 80 टक्क्यांवरून 35 ते 40 टक्क्यांपर्यंत खाली घसरले आहे.

याबाबत मुरूड आगारप्रमुख नीता जगताप यांची आगारात जाऊन भेट घेतली असता त्या म्हणाल्या की, भारमान मिळत नसल्याने एकूण 32 पैकी 10 फेर्‍या (बसेस) अलिबाग आगाराकडे वर्ग करण्यात आल्या असून, 133 पैकी 54 कर्मचार्‍यांच्या बदल्या अलिबाग व अन्यत्र करण्यात आल्या आहेत. या फेर्‍यांचे उत्पन्न अलिबाग आगाराला मिळणार आहे. सध्या 18 ते 19 फेर्‍या मुरूड आगरातून चालविण्यात येत आहेत. धुळे-1, पुणे-2, मुंबई-2, ठाणे-2, कल्याण-2, बोरिवली-2 अशा फेर्‍या अलिबाग आगराकडे वर्ग करण्यात आल्या आहेत. मुरूड आगरातून शिर्डी, भालगाव मार्गे मुंबई-3, साळाव-रोहा मार्गे मुंबई -4, कल्याण-1, पुणे-1 आणि सालाव ते मुरूड 10 फेर्‍या म्हणजे येऊन- जाऊन 20 फेर्‍या असे एकूण 19 फेर्‍या आहेत. रोहा ते मुरूड या फेर्‍या राहणार आहेत.

पुलावरून रिक्षा किंवा हलकी वाहने जात असून, अवजड वाहतूक बंद आहे. मुरूड आगाराचे उत्पन्न पुलाचे दुरुस्तीचे काम सुरू असल्याने घटल्याने 80 वरून 35 टक्क्यांवर आल्याने एसटी महामंडळाने दहा बसेसच्या फेर्‍या अलिबाग येथून सुरू केल्या आहेत. ही तात्पुरती व्यवस्था असली तरी मुरूड डेपो बंद तर होणार नाही ना, असा प्रश्‍न विचारला जात आहे. मुरूड आगाराकडून सध्या सुरू असलेल्या फेर्‍यांचा प्रवाशांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन आगार व्यवस्थापक नीता जगताप यांनी केले आहे.

मुरूड तालुक्यात सुट्टीत लाखो पर्यटक येत असतात. त्यामुळे अन्य गोष्टींबरोबरच थेट एसटी सेवा आवश्यक आहे. आगारासाठी सर्व मुरुडकरांनी वेळीच पाऊल उचलणे गरजेचे आहे. 1997 मध्ये मुरूड आगाराचे उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या हस्ते झालेले आहे.
  

Exit mobile version