| आगरदांडा | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्याला तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील लाडघर व गुहागर या समुद्रकिनाऱ्यांना 2026-27 च्या हंगामासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेचे ‘ब्ल्यू फ्लॅग’ मानांकन मिळाल्याचे समोर आले आहे. मात्र, निसर्गसौंदर्याने नटलेला आणि पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेला मुरुड-जंजिरा समुद्रकिनारा अद्याप या मानांकनापासून वंचित असल्याने मुरुडकरांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
मुरुड-जंजिरा समुद्रकिनाऱ्याला ‘ब्ल्यू फ्लॅग’ मानांकन मिळाल्यास शहराच्या पर्यटन विकासाला नवी दिशा मिळू शकते. या मानांकनामुळे समुद्रकिनाऱ्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण होण्यासोबतच पर्यावरण संवर्धन, समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता, सुरक्षितता, पाणी गुणवत्ता आणि पर्यटकांसाठी आवश्यक पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यास मदत होणार आहे.
विशेषतः मुरुड परिसरातील पर्यटन व्यवसायाला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाल्यास पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता असून, हॉटेल व्यवसाय, स्थानिक व्यावसायिक, छोटे दुकानदार, मच्छीमार आणि पर्यटनाशी संबंधित विविध घटकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होऊ शकतात. मुरुड समुद्रकिनाऱ्याला ‘ब्ल्यू फ्लॅग’ मानांकन मिळवून देण्यासाठी आवश्यक निकषांची पूर्तता करण्याच्या दृष्टीने लोकप्रतिनिधी, नगरपालिका प्रशासन आणि संबंधित शासकीय विभागांनी समन्वयाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी आवश्यक प्रस्ताव सादर करणे, पायाभूत सुविधांचा विकास करणे आणि मानांकनासाठी आवश्यक प्रक्रिया तातडीने सुरू करणे महत्त्वाचे ठरणार आहे. श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्याला मिळालेल्या मानांकनाच्या पार्श्वभूमीवर आता मुरुडच्या समुद्रकिनाऱ्यालाही आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘ब्ल्यू फ्लॅग’ मानांकन कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुरुडच्या पर्यटन विकासाला नवी झळाळी देण्यासाठी लोकप्रतिनिधींनी या विषयात लक्ष घालून ठोस पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा मुरुडकर नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.







