मुरुड समुद्रकिनारे पर्यटकांनी बहरले

हॉटेल हाऊसफुल्ल
| मुरुड जंजिरा | वार्ताहर |
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊननंतर मुरूड समुद्रकिनार्‍यावर पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहावयास मिळत आहे. दिवाळीच्या सुट्टीचा शेवटचा हंगाम असल्याने मागील दोन दिवसांपासून मुरुड समुद्रकिनारा पर्यटकांनी फुलला आहे. हॉटेल व लॉजिंगमध्ये तुडुंब गर्दी पहावयास मिळत आहे. वाहनांची संख्या वाढल्याने समुद्रकिनारी रस्त्यावर ट्रॅफिक पहावयास मिळाली. वाळूवरच्या गाड्या व घोडा गाडीचा मनमुराद आनंद घेताना पर्यटक दिसत होते. सलग सुट्ट्यांमुळे राज्याभरातून अनेक पर्यटकांनी जंजिरा किल्ला पाहण्यासाठी अधिक पसंती दिली. स्वतःची वाहने घेऊन आलेल्या पर्यटकांची बेसुमार गर्दी जंजिरा किल्ला पहावयास मिळाली. राजपुरी येथे गाड्या पार्क करुन जेट्टीवरुन शिडाच्या होड्यांद्वारे किल्ल्याकडे पर्यटकांना नेले जाते. रविवारी सकाळपासूनच मुरुड समुद्रकिनारी सुट्टी साजरी करण्यासाठी असंख्य पर्यटक मुंबई, पुणे, ठाणे व इतर शहरांतून आणि जिल्हाच्या विविध भागातून कुटुंबासह मोठ्या संख्येने समुद्रकिनारी दाखल झाले आहेत.

पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण
मुरुड नगरपालिकेने समुद्रकिनारी वाळूत पार्किंगची व्यवस्था खुली केल्याने पर्यटक खुश आहेत. त्यामुळे किनार्‍यावर गाडी पार्क करून समुद्रात पोहण्याचा आनंद घेता येत आहे.सध्यातरी पार्किंगचे कोणतेही भाडे पालिकेने लावलेले नाही. वाळूत ओपन बाथ शॉवर असावेत, अशी पर्यटकांची मागणी आहे.

शांत ठिकाणांना पसंती
समुद्र स्नानाबरोबरच पर्यटकांनी वॉटर स्पोर्ट्स बाइक व बनाना रायडिंगचाही आनंद घेतला. भरपूर गर्दी व पर्यटकांच्या येण्याने समुद्रकिनारे गजबजून गेले होते. सर्व लॉज फुल्ल असल्याने पर्यटकांना काही ठिकाणी राहण्याची समस्याही उद्भवली. मुरुडमधील काशीद बीच, दत्त मंदिर, गारंबी, जंजिरा किल्ला, ईदगाह हा परिसर आल्हाददायक, शांत, रमणीय आहे.

Exit mobile version