ॲड. अलिया सिर्सिकर यांचा प्रशासनाच्या कारभारावर संताप
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
मुरूडमध्ये सागरी महामार्गाच्या कामाच्या नावाखाली डांबरी रस्ते खोदण्याचे काम सुरु आहे. मात्र, येथील खोदलेल्या डांबरी खडीचा भराव नांदगावमधील तळेगल्लीतील खड्डे बुंजविण्यासाठी केला जात आहे. त्यामुळे त्याचा नाहक त्रास प्रवासी वर्गासह येथील नागरिकांना होत आहे. त्यामुळे चांगल्या रस्त्याच्या नावाखाली करण्यात आलेल्या या भरावाबाबत ग्रामपंचायतीला तोंडी सांगूनही स्थानिक प्रशासनाकडून दुर्लक्ष केल्याचा आरोप ॲड. अलिया सिर्सिकर यांनी केला आहे. तसेच, तातडीने उपाययोजना न केल्यास त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
ॲड. अलिया सिर्सिकर यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, नांदगावमधील तळेगल्ली हा परिसर कायमच गजबजलेला असतो. या भागातून अनेक वाहनांची वर्दळ असते. पादचारी देखील या भागातून समुद्रकिनारी ये-जा करीत असतात. मात्र, या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. सध्या मुरूडमध्ये सागरी महामार्गाच्या नावाखाली काँक्रीट रस्त्याचे काम सुरु आहे. त्यामुळे तेथील डांबरी रस्ते खोदण्यात आले आहेत. मात्र, येथील स्थानिक प्रशासनाने चांगल्या रस्त्याचा दिखावा करीत खोदलेल्या डांबरी रस्त्याचा टाकाऊ माल नांदगावमधील तळेगल्ली रस्त्यावर टाकून दिला आहे. त्याचा नाहक त्रास प्रवासी वर्गासह येथील नागरिकांना होत आहे. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणे कठीण झाले असून, अपघात होण्याची भितीही निर्माण झाली आहे. असा आरोप करत याबाबत नांदगावच्या ग्रामपंचायतीला सिर्सिकर यांनी तोंडी सांगून समस्या मांडली. मात्र, त्यांच्याकडून दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.







