शनिवारपासूनच हजारो पर्यटक दाखल
| मुरूड जंजिरा | वार्ताहर |
राज्यात शालेय सुट्टी पडल्याने उन्हाळी सुट्टी एन्जॉय करण्यासाठी पर्यटक निर्धास्तपणे पर्यटनाला बाहेर पडू लागल्याचे शनिवारपासून दिसून येत आहे. विशेष करून कोकणातील समुद्रकिनार्यांना पर्यटकांची विशेष पसंती असल्याचे ठिकठिकाणच्या माहीतगार मंडळींकडून शनिवारी सायंकाळी सांगण्यात आले. रायगडातील समुद्रकिनार्यावरील अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन, दिवेआगर, हरिहरेश्वर आदी ठिकाणी पर्यटकांची भरती वाढती असून, यंदा पर्यटक कोकणात अधिक मोठ्या प्रमाणात उतरतील, असा विश्वास पर्यटन क्षेत्रातील एक्स्पर्ट मंडळींनी व्यक्त केला आहे.
रायगडातील मुरूड पर्यटन क्षेत्रात प्रसिद्ध जंजिरा पाहण्यासाठी यंदा पर्यटकांची मोठी मांदियाळी उतरेल, असे विविध ठिकाणाहून समजले आहे. एकाच वर्षात जंजिर्याला सुमारे पाच लाख पर्यटक भेट देतात, यावरून कल्पना यावी. शिवाय पद्मजलदुर्ग पाहण्याची सुविधा मुरूडमधून सुरू केल्याने दोन्ही जलदुर्गांचे दर्शन पर्यटकांना घेता येणार आहे. शनिवारी प्रसिद्ध काशीद बीचवर मोठ्या संख्येने पर्यटक उतरल्याने दिसून आले. शेकडो वाहनांनी पार्किंग फुल्ल झालेले दिसत होते. मग मिळेल तेथे पार्किंग करावे लागत होते.शेकडो पर्यटक समुद्रात पोहण्यासाठी उतरून मौज आणि आनंद लुटताना दिसत होते. मुरूड समुद्रकिनारी सायंकाळी पर्यटकांची वाहने येण्यास सुरुवात झाली.
रेवदंडा-साळाव पुलावरून जड वाहनांची वाहतूक बंद असली तरी पाच टनापेक्षा कमी वजनाची कार, छोटी चारचाकी वाहनांची वाहतुकीला परवानगी असल्याने अनेक वाहने नागाव, चौल, रेवदंडा, काशीद, नांदगाव, मुरूड, श्रीवर्धनकडे जाताना दिसत होती. पुणे, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र, धुळे, नाशिक, ठाणे, पालघर, जळगाव आदी जिल्ह्यातील पर्यटक समुद्रकिनार्यावर उतरले असून, कोकण साठी पर्यटन विकासाला मोठी चालना देणारी घटना ठरणार आहे. मुरूड किनार्यावरदेखील पर्यटकांची मोठी वर्दळ दिसत असून, मे महिन्यात पर्यटन प्रचंड वाढेल, असा कयास ठिकठिकाणी व्यक्त होत आहे.