पर्यटकांच्या आगमनाने मुरुड फुलले

नागावपासूनच वाहतूक कोंडी
मुरूड | वार्ताहर |
जंजिरा जलदुर्ग पर्यटकांना पाहण्यासाठी शासनाने खुला केल्याने अपेक्षेप्रमाणे रविवारी पर्यटकांची मोठी गर्दी उसळली असून नागाव ते मुरूड या 40 किमी मार्गावर पर्यटकांच्या वाहनांची प्रचंड वर्दळ सकाळ पासून दिसून येत होती.तर मुरुडचा बीच शनिवारीच पर्यटकांनी गजबजून गेला आहे.नागाव, रेवदंडा,काशीद, नांदगांव, मुरूड बीचवर रविवारी पर्यटकांचा मोठा पूर आल्याचे दिसून आले.काही ठिकाणी वाहनांची मोठी कोंडी होत होती.
रविवारी सकाळपासून जंजिरा पाहण्यासाठी सुमरेक 300 वाहने गेल्याची माहिती मुरूड नगरपरिषद टोल कर्मचारी जयेश चोडणेकर, यांनी कल दुपारी बोलताना दिली.राजपुरी, खोरा जेट्टी येथून जंजिर्‍यात जाण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी उसळली होती. यामुळे मुरूड मधून जाताना पर्यटकांच्या वाहनांची कोंडी होताना दिसत होती.निर्बंध शिथिल केले असले तरी शासनाचे काही निर्बंध पाळले जातात की नाही, यावर पोलिसांची करडी नजर होती. किनार्‍यावर पोलीस गस्त घालताना दिसत होते. नागाव, काशीद बीचवर पर्यटकांची मोठी मांदियाळी दिसत होती.
गेल्या शुक्रवार पासून जंजिरा खुला केल्याचे समजताच पर्यटकांची संख्या तिपटीने वाढली आहे.असंख्य पर्यटक शनिवारीच मुरूड मध्ये डेरेदाखल झाल्याचे दिसत होते.मुरूड मध्ये बीचवरील वाळूवर मोफत पार्किंगची सुविधा असल्याने पर्यटकांनी बिनधास्त वाहने पार्क करून समुद्रात जलक्रीडांचा आस्वाद घेतल्याचे दिसून आले.

Exit mobile version