। मुरुड । प्रतिनिधी ।
मुरुड पोलिसांनी घरफोडीच्या मोठ्या गुन्ह्याचा छडा लावत तब्बल 10 लाख 50 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त केले असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुरुड येथील तक्रारदार रामचंद्र सहादेव काते हे कुटुंबासह मुंबई येथे गेले असताना त्यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने कपाटातील सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना 2 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी 2026 या कालावधीत घडली असून, तक्रारदार परत आल्यानंतर चोरी उघडकीस आली. याबाबत 17 फेब्रुवारी 2026 रोजी मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. या घटनेचा तपास सुरू करत पोलिसांनी परिसरात शोधमोहीम राबवली. गुप्त माहितीच्या आधारे संशयित आरोपीचा शोध घेऊन त्याला 17 फेब्रुवारी रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने घरफोडी केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी आरोपीकडून त्याच्या ताब्यातील सुमारे 30 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन चेन किंमत 4,20,000 रुपये, 15 ग्रॅम वजनाचे दोन डाव व कड्या — किंमत 2,10,000 रुपये, 30 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या अंगठ्या — किंमत 4,20,000 रुपये असा एकूण जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे 10,50,000 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई पोलीस अधीक्षक रायगड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथकात मुरुड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक तसेच कर्मचारी यांचा समावेश होता. सध्या आरोपीला न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी मिळवण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, घर बंद ठेवून बाहेर जाताना मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.
मुरुड घरफोडी प्रकरण! लाखोंचे सोन्याचे दागिने जप्त; आरोपी अटकेत
