वेळेआधीच जंजिरा कुलूपबंद

पर्यटकांची घोर निराशा, शेकडो वाहने माघारी

| मुरूड जंजिरा | वार्ताहर |

निर्धारित वेळे आधीच जंजिरा किल्ला शुक्रवारी 24 मे रोजी सकाळी 11 वाजल्यापासून वादळी वातावरणामुळे सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांसाठी बंद करण्यात आला. परिणामी, राज्यभरातून आलेल्या अनेक पर्यटकांची घोर निराशा झाल्याचे दिसून आले. जंजिरा बंद समजल्याने मुरूड, रोहा, दिघी, श्रीवर्धन, पुणे, अलिबाग, मुंबईकडून आलेली पर्यटकांची सुमारे 600 वाहने माघारी वळविण्यात आल्याचे दिसून आले.

शासकीय आदेशाप्रमाणे 26 मेपासून जंजिराचे दरवाजे पर्यटकांसाठी बंद करण्यात येणार होते. मात्र, गुरुवारपासून वादळी वातावरणामुळे समुद्रात लाटा उसळू लागल्याने पर्यटकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मेरिटाइम बोर्डाचे खोरा बंदर निरीक्षक प्रमोद राऊळ आणि पुरातत्व विभागाचे अधिकारी बजरंग येलीकर यांनी दिली. शनिवारी दुपारी खोरा बंदर जेट्टीवर भेट दिली असता असंख्य पर्यटक सकाळपासून जंजिरा पाहण्यासाठी दाखल झाल्याचं स्टॉल्सधारकांनी सांगितले. परंतु, समुद्रात जंजिऱ्यावर उसळणाऱ्या लाटांचे तांडव पाहून पर्यटकांना धडकी भरल्याने शांत राहणेच पसंद केले. मुरूडच्या आर्थिक पर्यटन विकासात जंजिरा जलदुर्ग हा सर्वात मोठा पॉईंट आहे, यात दुमत नाही. 23 मेपासूनच समुद्रात हळूहळू वादळी घडामोडी होण्यास सुरुवात झाली होती. या घडामोडी कदाचित शांत होतील, अशी आशा फोल ठरल्याचे राजपुरी बंदर जेट्टीवर सांगण्यात आले. अचानक वातावरणात बदल झाल्याने जंजिरा जलदुर्ग निर्धारित वेळेआधीच बंद करण्यात आला आल्याने पर्यटकांची घोर निराशा झाल्याचे स्पष्ट दिसून आले. पर्यटन व्यावसायिकांचेदेखील नुकसान होणार आहे.

समुद्रात लाटांचा उसळण्याचा वेग वाढला असल्याचे खोरा बंदर जेट्टीवरून शनिवारी दुपारी दिसून आले.जंजिरा जलदुर्गाजवळील प्रवेशद्वारावर पर्यटकांना उतरणे धोकादायक बनल्याने केवळ शिडाच्या बोटी आणि मोटर लाँचमधून पर्यटकांना जंजिरा बाहेरून दाखविण्यात आला. खोरा जेट्टीवर मुरूड पर्यटन जलवाहतूक सहकारी संस्थेच्या चार लॉन्च असल्याचे संस्थेचे खोरा येथील लिपिक बबन सतवीडकर यांनी दिली. पुणे, मुंबई, कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्राच्या विविध भागातून पर्यटक जलदुर्ग बंद असल्याची माहिती नसल्याने येतच होते. गुरुवारपासूनच समुद्रात लाटा उसळत असल्याची माहिती एकदरा कोळी समाज अध्यक्ष, मुरूड मच्चीमार कृती समिती अध्यक्ष तथा हनुमान मच्छिमार सहकारी संस्थेचे चेअरमन पांडुरंग आगरकर यांनी दिली.

Exit mobile version