मुरूड ग्रामीण रुग्णालयात कर्मचाऱ्यांची वानवा

वैद्यकीय अधिकाऱ्यांसह अकरा पदे रिक्त

| कोर्लई | वार्ताहर |

मुरुडच्या ग्रामीण रुग्णालयात तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांसह अकरा पदे रिक्त असल्याने याचा आरोग्य सेवेवर परिणाम होत असून, तातडीने रिक्त पदे भरण्यात यावीत, अशी मागणी नागरिकांतून जोर धरीत आहे.

मुरुडमध्ये नबाबकालीन असलेल्या या रुग्णालयात शहरासह तालुक्यातील दुर्गम भागातील रुग्ण मोठ्या संख्येने येतात. मात्र, वैद्यकीय अधिकारी व अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे त्यांना उपचारासाठी अडचणीचे होते. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसह अकरा पदे रिक्त आहेत. त्यामुळे कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण येतो. त्यामुळे रिक्त पदे तातडीने व कायमस्वरूपी भरण्यात यावीत, अशी मागणी नागरिक, रुग्ण तसेच नातेवाईकांकडून होत आहे.

ग्रामीण रुग्णालयातील तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त झाली आहेत, तर काही कर्मचाऱ्यांचा अस्थायी सेवेचा कार्यकाळ डिसेंबरअखेर संपुष्टात येत असल्याने रुग्णालयातील एक अधिपरिचारिका, एक औषध निर्माण अधिकारी, चार कक्षसेवक, एक सफाई कामगार आणि दंत सहायक (वर्ग 4) अशी एकूण अकरा पदे रिक्त झाली आहेत. कर्मचारी नियुक्त न केल्यामुळे रुग्णसेवेत अनियमिता, तसेच आपत्तीजनक स्थिती ओढवल्यास निर्णय घेताना अडचणीचे होते. हंगामी तत्त्वावर, तसेच कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येत असल्याने बाह्य रुग्णसेवेवरही याचा परिणाम होत आहे. ग्रामीण रुग्णालयात दररोज किमान 100 रुग्णांची तपासणी होते. याठिकाणी 30 खाटांची क्षमता आहे. शासनाच्या संबंधित अधिकारी वर्गाने यात तातडीने लक्ष पुरवून वैद्यकीय अधिकाऱ्यांसह रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत, अशी मागणी नागरिकांतून जोर धरीत आहे.

Exit mobile version