। अलिबाग । वार्ताहर ।
मुरूड येथून शिर्डीला निघालेल्या एसटी बसचा मंगळवारी (दि.1) दुपारी कळंबोलीमध्ये अपघात झाला. या अपघातामध्ये एसटीतील सहा प्रवासी जखमी झाले आहेत. कंटेनर व एसटीची धडक लागल्याने हा अपघात झाल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे.
मुरूड-शिर्डी ही एसटी बस सकाळी सव्वाआठ वाजता मुरूड स्थानकातून निघाली. सकाळी 10 वाजता अलिबाग स्थानकात ती आली. त्यानंतर अलिबागमधून सकाळी 10.30 वाजता बस शिर्डीकडे निघाली. या एसटीमध्ये आरक्षित 18 प्रवाशांसह 35 प्रवासी होते. पनवेल येथून शिर्डीकडे जाताना दुपारी 12.30 ते एक वाजण्याच्या सुमारास रोडपाली सिग्नलच्या पुढे आल्यावर चौकामधून एक कंटनेर एसटीच्या पुढे आला.
अचानक पुढे आलेल्या कंटनेरचा अंदाज न आल्याने एसटी बसचालकाचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामध्ये एसटीची कंटनेरला जोरदार धडक लागली. या धडकेत एसटी बस व कंटनेरचा मोठा अपघात झाला. त्यात सहा प्रवासी जखमी झाले आहेत. तर दोन प्रवाशांना गंभीर दुखापत झाली. या घटनेची माहिती मिळताच पनवेल एसटी बस आगारातील व्यवस्थापक विलास गावडे यांच्यासह अन्य कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. किरकोळ दुखापत झालेल्या जखमींसह अन्य प्रवाशांची विचारपूस करून त्यांना कल्याण एसटीतून मार्गस्थ केले. याप्रकरणी कळंबोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती आगार व्यवस्थापक गावडे यांनी दिली.