तालुका स्पर्धेत मुरुडच्या विद्यार्थ्यांचा दबदबा

समूह खेळात सहा, तर वैयक्तिक 69 पदकांची कमाई

| मुरूड | प्रतिनिधी |

मुरुड तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत सर एस.ए. हायस्कूल मुरुडच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारत समूह खेळात सहा, तर वैयक्तिक खेळात तब्बल 69 पदकांची लयलूट केली आहे. कबड्डी, खो खो, रिले स्पर्धेत अव्वल स्थानासह इतर वैयक्तिक खेळांमध्ये बाजी मारत पदकांची लयलूट केली आहे. त्यामुळे मुरुड शहरासह तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सांघिक क्रीडा स्पर्धा खो-खोमध्ये 14 वर्ष, 17 वर्ष 19 वर्ष या वयोगटांमध्ये मुले व मुलींच्या संघांनी प्रथम क्रमांक पटकाविला, तसेच कबड्डीत 19 वर्ष वयोगटामध्ये मुले व मुलींनी तालुक्यात अव्वल स्थान पटकाविले. तर, 17 वर्ष वयोगटामध्ये मुलींनी द्वितीय क्रमांक पटकाविला.

तालुकास्तरीय सांघिक रिले स्पर्धेत 14 वर्ष वयोगटातील मुले व मुलींनी प्रथम क्रमांक मिळवला. तर, 17 वर्षे वयोगटातील मुलींनी द्वितीय क्रमांक पटकाविला. तसेच धावणे, उंच उडी, लांब उडी, गोळा फेक, थाळी फेक, बुद्धीबळ अशा वैयक्तिक स्पर्धांमध्येदेखील सर एस.ए. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा दबदबा राहिला. एकूण सहभागी 108 विद्यार्थ्यांनी वैयक्तिक खेळ प्रकारात तब्बल 69 पारितोषिके कमावली.

हायस्कूलच्या घवघवीत यशाचे मुख्याध्यापक सरोज रौष व अंजिश विद्या मंडलचे सर्व संचालकांनी कौतुक केले. तसेच या यशामध्ये मोलाचा वाटा असणारे क्रीडा शिक्षक बालाजी घुगे, महेंद्र घाटवळ, सौ. पी. आरेकर, आनंद तोंडले, दिपक पालशेतकर यांचेदेखील अभिनंदन केले.

Exit mobile version