धुक्यात डोंगर, रस्ते हरविले
| मुरूड जंजिरा | वार्ताहर |
गेल्या दोन दिवसात वातावरणात मोठा बदल घडून आला असून, गारठा अधिक वाढला आहे. पर्यटन क्षेत्र असणाऱ्या मुरूड तालुक्यात तापमान घसरले असून, शुक्रवारी सकाळी तापमानाचा पारा 20 सेल्सिअंशपर्यंत खाली आल्याने मुरुडकरांना हुडहुडी भरली आहे. दोन दिवसांपूर्वी तापमानाचा पारा 22 ते 23 सेल्सिअंश होता.
शुक्रवारी सकाळी येथे वातावरणात आभट पसरले होते. सकाळी पहाटे थंडी आधिक वाढल्याने मॉर्निंग वॉक करणाऱ्या मंडळींनादेखील याची चांगलीच झळ पोहोचलेली दिसून आली. अनेकजणांना हुडहुडी भरल्याने काहींनी मधूनच घरचा रस्ता पकडला. सकाळी दव पडल्याने थंडीचा प्रभाव वाढल्याचे जाणवले. पहाटे धुक्यामुळे रस्ता हरवलेला दिसून येत होता. शिघ्रे-खारआंबोली मार्गावर वाहने चालविणारे वाहन चालकांनी सांगितले की, धुक्याची तीव्रता कमी-जास्त होत असल्याने वाहनांचा वेग कमी राखून अधिक सावधगिरी बाळगून वाहने चालवावी लागत आहेत. वाणदे गावचे ज्येष्ठ शेतकरी तुकाराम पाटील यांनी सांगितले की, धुक्याचे प्रमाण वाढल्याने सभोवताली असणारे डोंगरदेखील दिसून येत नव्हते. थंडी वाढल्याने ताप, खोकला आदी आजारपण डोके वर काढत आहे. ज्येष्ठांना थंडीचा त्रास होण्याची शक्यता आधिक आहे. दरम्यान, मुरूड परिसरात आरोग्य तपासणी सुरूच असून, अद्याप एकही कोरोना रुग्ण आढळून आलेला नाही, अशी माहिती मुरूड ग्रामीण रुग्णालयाच्या वरिष्ठ अधिपरिचारिका निर्मला भोसले यांनी दिली.
थंडीत पंचक्रोशीतील खलाटीत कडव्या वालाचे हिरवेगार पीक तरारून आले आहे. खारआंबोली, वाणदे, उंडरगाव, जोसरांजन, वावडुंगी, शिघ्रे, सायगाव, तेलवडे, नविवाडी शिघ्रे, कडव्या वालाचे पीक बहरले आहे. थंडीचा किंवा दवाचा यावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नाही, अशी माहिती तुकाराम पाटील यांनी दिली. आंबा पीक मोहरण्यासाठी थंडी उपयुक्त ठरते, असेही त्यांनी स्पष्ट केले. थंडीत पोपटी करण्याचे बेत आखले जात असले तरी येथील कडव्या वालाच्या शेंगा अजूनही बाजारात विक्रीस आलेल्या नाहीत, अशी माहिती तुकाराम पाटील यांनी दिली.







