मुरुडच्या पर्यटनाला फटका

सफाई न झाल्याने जंजिरा पर्यटकांसाठी बंदच

| मुरुड जंजिरा | वार्ताहर |

पर्यटकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटनासाठी बंद असलेला जंजिरा किल्ला तीन महिन्यांपासून बंद आहे. दरम्यान, पर्यटनासाठी किल्ला सुरू करायचा असल्यास साफसफाईला पंधरा दिवसांचा कालावधी जातो. परंतु, पुरातत्व खात्याकडून अद्याप सफाई न झाल्याने किल्ल्याचे दरवाजे पर्यटकांसाठी अद्याप बंदच आहेत. किल्ला बंद असल्याने पर्यटकही फिरकत नसल्याने त्याचा फटका मुरुडच्या पर्यटनाला बसत आहे. चार दिवस सलग सुट्टया असूनही पर्यटक नसल्याने मोठा फटका बसत असून, हॉटेल व्यावसायिक, शिडाच्या बोटधारक नाराज आहेत.

मुरुडचा जंजिरा किल्ला पावसाळ्याची तीन महिने समुद्र खवळल्याने व वादळी वाऱ्यामुळे पर्यटकांसाठी 25 मे रोजी बंद केला जातो. साधारणतः 1 ऑगस्टला मासेमारी बोटी सुरु होतात. तसेच जंजिरा किल्ल्यात जाणाऱ्या 15 ऑगस्तपर्यंत सुरु होणे अपेक्षित आहे. परंतु पावसाने जंजिरा किल्ल्यात मोठ्या प्रमाणात झाडी वाढल्याने किल्ला फिरणे पर्यटकांसाठी धोकादायक आहे. जर 15 ऑगस्टपर्यंत किल्ला पर्यटकांसाठी खुला करायचा असेल, तर पुरातत्व खात्याने 15 दिवस अगोदर किल्ला सफाईचे काम सुरु करणे अपेक्षित आहे. परंतु, तसे होत नाही. दरवर्षी निधी व कामाला मजूर मिळत नाही ही करणे देऊन पुरातव खात्याचे अधिकारी कामाला सुरुवात करत नाही. आता सप्टेंबर महिना संपत आला असून, सफाईचे काम कधी होणार याबाबत पुरातत्व खात्याचे अधिकारी बजरंग येलीकर यांना विचारले असता, सतत पाऊस असल्याने झाडे कापणे व स्वच्छता करण्यात अडचणी येत आहेत. पुढील आठ दिवसांत जंजिरा किल्ला खुला करण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन त्यांनी दिले. परंतु, सलग चार दिवस सुट्टी असल्याने मुरुडला हजारो पर्यटक येणार; परंतु जंजिरा किल्ला बंद असल्याने पर्यटक येणार की नाही, ही शंका असल्याने हॉटेल व्यावसायिक व बोटधारक नाराज आहेत. आधीच पावसाळ्यात तीन महिने पूर्ण बसून काढले, हॉटेलमध्ये ग्राहक नसल्याने खूप नुकसान झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

बुरुजाला भगदाडे, दुरुस्ती नाही
मुरुड जंजिरा येथील आर्थिक विकास पूर्णतः पर्यटनावर अवलंबून आहे, त्यासाठी जंजिरा किल्ला हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. जंजिरा किल्ल्याची समुद्राच्या लाटांनी अनेक बुरुजाला मोठी भगदाडे पडलीत. आता या पावसात तलावासमोरील दरवाजा पडला आहे. गेल्या 15 वर्षात एकदाही किल्ल्याचे बुरुज दुरुस्तीला निधी आला नाही, असे अधिकरी सांगतात, मग किल्ल्यात प्रवेश तिकिटामधून मिळणारे पैसे जातात कुठे, असा प्रश्न मुरुडकर करीत आहेत. ते पैसे किल्ला दुरुस्तीसाठी वापरावे, अशी मागणी होत आहे.

कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा
जंजिरा किल्ल्यासाठी प्रशस्त जेटी लवकरच सुरु होणार, पण कधी हे कोण सांगणार? जेटीवर सावलीसाठी पत्रा शेड असणे गरजेचे आहे. दुसरे म्हणजे, पर्यटक किल्ला पाहण्यासाठी सकाळी 7 वाजता जेटीवर हजार राहतात, पण पुरातत्व खात्याचा कर्मचारी वर्ग 9.30 वाजता येतो. त्यानंतर तिकीट मिळणार आणि किल्ल्यात जाणार. जर तिकीट देणारे कर्मचारी सकाळी 8 वाजता हजर झाले, तर पर्यटकांची गर्दी कमी होईल व थंड वातावरणात पर्यटक किल्ला पाहतील.

सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मुरुडला पसंती देतात. परंतु, बुकिंग करण्याआधी पर्यटक जंजिरा सुरू आहे का, अशी विचारणा करतात. पण, किल्ला सुरू नाही, असे सांगितल्यानंतर बुकिंग करीत नाहीत. याचा परिणाम व्यवसायावर होत आहे.

मनोहर बैले, व्यावसायिक, एकविरा लॉज
Exit mobile version