वाढत्या थंडीने मुरुडचे पर्यटन बहरणार

| मुरूड | वार्ताहर |

पाऊस परत गेला असून दिवाळी सण देखील संपला आहे. आता मुरूड तालुक्यात थंडी पडू लागली असून दिवसेगाणिक थंडीची तीव्रता वाढती असल्याचे जाणवते आहे. गुलाबी थंडीअसल्याने पर्यटनाला उत्तम काळ असल्याचे दिसून येत आहे.

तालुक्यातील पर्यटन स्थळांवर पर्यटकांची वर्दळ दिसून येत असून सुट्टीच्या दिवसात पर्यटकांचे लोंढे आधिक प्रमाणात येथे दिसून येत आहेत. काशीद बीच, मुरूड बीच वर पर्यटकांची मांदियाळी स्थिरावत असून येथील पर्यटन व्यवसायाला उर्जितावस्था येताना दिसत आहे. सध्या मुरूड तालुक्याचा तापमान पारा 27 सेल्सिअस इतका खाली आला आहे. ऑक्टोबर मध्ये हाच तापमान पारा 34 सेल्सिअस होता. शनिवार-रविवार आणि सुटीच्या दिवसात मात्र पर्यटकांची संख्या आधिक वाढत असल्याचे अनेक स्टॉल धारकानी सांगितले.

जंजिरा जलदुर्ग हा पर्यटकांसाठी महत्त्वाचा पॉईंट ठरत असून खोरा बंदर जेट्टी आणि राजपूरी बंदर जेट्टी वरून पर्यटक लॉन्च आणि शिडाच्या बोटीमधून जंजिरा किल्ला पाहण्यासाठीचा आनंद लुटताना दिसून येत आहेत. शिडाच्या बोटींची सुविधा फक्त राजपूरी जेट्टी वर उपलब्ध आहे. खोरा बंदर जेट्टी वरून मोटर लाँचने जंजिरा किल्याकडे जाता येते. कुठूनही गेले तरी सकाळच्या वेळेत जंजिर्‍यात जाणे सोयीचे आहे. अन्यथा उन्हाचा त्रास होऊ शकतो. जंजिरा आता पुरातत्व खात्याने पर्यटकांसाठी पूर्णपणे खुला केला असल्याने पर्यटकांची रोज वर्दळ सुरू झाल्याचे बुधवारी देखील दिसून आले. शनिवारी, रविवारी मात्र ही पर्यटकांची संख्या वाढत आहे. जंजिरा किल्यात उतरण्यासाठी अद्याप जेट्टी तयार झाली नसल्याने पर्यटकांना अपघात होण्याची दाट शक्यता मात्र दिसून येत आहे.

मुरूड तालुक्यातील काशीद बीच सर्वदूर प्रसिद्ध आहे. मुरूड ते काशीद हे अंतर 22 किमी असून यामध्ये नांदगांव हे गाव असून येथील बीच देखील रमणीय आहे. नांदगाव येथील साक्षात्कारी श्रीवसिद्धीविनायक मंदिर याच मार्गावर आहे. प्रख्यात ग्रहलाघवकार गणेश दैवज्ञ यांचे कुलदैवत आहे. असे म्हणतात की, नांदगावच्या श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्या शिवाय अष्टविनायक यात्रा पूर्ण होत नाही. मुरूड तालुक्यात फणसाड अभयारण्य, साळाव येथील विक्रम गणेश मंदिर, मुरूड येथील पुरातन श्री दत्त देवस्थान, बारशिव येथील रॉक बीच, आगरदांडा बंदर प्रकल्प, गारम्बी आणि आंबोली धरण, सर्वे बीच, खोरा प्रवासी बंदर अशी विविध पाहण्याजोगी ठिकाणे आहेत. मुरूड हे स्वातंत्र्य पूर्व काळातील जंजिरा संस्थांनचे राजधानीचे शहर असून त्याच्या ऐतिहासिक खुणा अनेक इमारती, काटकोनातील रस्ते, आरोग्य, शैक्षणिक आणि शासकीय वास्तूमधून दिसून येतात.

Exit mobile version