सुरजागड खाण विरोधी आंदोलनकर्त्यांची प्रशासनाकडून मुस्कटदाबी

सत्र न्यायालयात अपील दाखल झाल्यानंतरही ‘अरेस्ट वॉरंट’ जारी
। गडचिरोली । वार्ताहर ।
जिल्ह्यातील जनविरोधी 25 लोह खदानी कायमस्वरूपी रद्द करण्यासाठी दिनांक 25 ऑक्टोंबर 2021 रोजी सुरजागड पारंपरिक इलाका गोटूल समीती आणि जिल्हा महाग्रामसभा स्वायत्त परिषदेने भव्य मोर्चा काढून जनतेच्या वतीने बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आले. 28 ऑक्टोंबर रोजी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी सदर ठिय्या आंदोलना भेट देऊन निवेदन स्वीकारले व पुढे पाठविण्याचे आश्‍वासन दिले. मात्र आंदोलनकारी जनतेने मागण्यांच्या संबंधाने मुद्दे निहाय चर्चा किमान जिल्हा स्तरावरील प्रश्‍नांची सोडवणूक करावी मागणी केली होती. यानंतरही प्रशासनाने पोलिस बळाचा वापर करून जि.प.सदस्य सैनू गोटा, पं.स.सदस्य शिला गोटा, शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते, जयश्री वेळदा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ.अमोल मारकवार, जिल्हा महाग्रामसभा स्वायत्त परिषदेचे सचिव नितीन पदा या प्रमुख आंदोलनकर्त्यांना दुसरे दिवशी दिनांक 29 ऑक्टोंबर रोजी पहाटे 5.50 वाजता भा.दं.वि कलम 188 व इतर कलमान्वये कारवाई करीत अटक करून न्यायालयात हजर केले होते.
त्याच दिवशी रात्री 9.00 वाजता त्याच प्रकरणात एट्टापली उपविभागीय दंडाधिकारी यांनी सीआरपीसी कलम 107 अन्वये नोटीस बजावली. दि. 08 नोव्हेंबर 2021 रोजी सदर नोटीसीला आंदोलनकर्त्यांनी उत्तर सादर केलेले असतांनाही त्याचदिवशी 7 दिवसांचे आत रुपये 5000/- चे बॉन्ड लिहून देण्याचे व तेवढ्याच रक्कमेसाठी एक जामीनदार एक वर्षांसाठी सादर करण्याचा आदेश उपविभागीय दंडाधिकारी,एट्टापली यांनी जारी केले होते. सदर आदेशाविरुद्ध सीआरपीसी कलम 397 नुसार दि. 11 नोव्हेंबर 2021 रोजी जिल्हा सत्र न्यायालयात अपील दाखल करण्यात आले. दिनांक 13 नोव्हेंबरला ते रजिस्टर होवून दिनांक 15 नोव्हेंबर ला मानणीय सत्र न्यायालयाने पुढिल सुनावणी दिनांक 07 डिसेंबर रोजी ठेवून प्रकरण अतिरिक्त सत्र न्यायालयाकडे वर्ग केले. असे असतांनाही उपविभागीय अधिकारी, एट्टापली यांनी दि.22 नोव्हेंबर रोजी फर्मान आदेश काढून दिनांक 26 नोव्हेंबर रोजी त्यांच्या न्यायालयात हजर राहण्याचे नोटीस सैनू गोटा,शिला गोटा, रामदास जराते, जयश्री वेळदा (जराते), अमोल मारकवार, नितीन पदा, ड.लालसू नोगोटी, सुखराम मडावी, गोई कोडापे यांना बजावली.

सदर प्रकरणी आंदोलनकर्त्यांनी एट्टापली उपविभागीय दंडाधिकारी यांच्या आदेशाविरुद्ध जिल्हा सत्र न्यायालयात अपील दाखल केले असल्याने ते दिनांक 26 नोव्हेंबर संविधान दिनी त्यांच्या न्यायालयात हजर झाले नाही. त्यामुळे उपविभागीय दंडाधिकारी, एट्टापली यांनी दिनांक 26 नोव्हेंबर रोजी सदर आंदोलनकर्त्यांच्या विरोधात मअरेस्ट वॉरंटफ जारी केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. संबंधित पोलिस ठाण्याचे पोलिस उद्या सोमवार दि.29 नोव्हेंबरला सर्व प्रमुख आंदोलनकर्त्यांना अटक करून एट्टापली उपविभागीय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर करण्याची शक्यता आहे. उपविभागीय दंडाधिकारी यांच्या आदेशाविरुद्ध जिल्हा सत्र न्यायालयात अपील दाखल झाल्यानंतरही सुरजागड खाण विरोधी आंदोलनकर्त्यांविरोधात कलमांचा बडगा दाखवून कारवाई सुरुच ठेवल्याने आता जिल्हाभरात उलटसुलट चर्चांना उधाण आले असून लोह अयस्काची लिज असलेल्या लॉयड मेटल्स कंपनीचे संचालक हे गुप्ता असल्यानेच उपविभागीय दंडाधिकारी शुभम गुप्ता आंदोलनकर्त्यांचा आवाज दाबण्यासाठीच अशा प्रकारची द्वेशपूर्ण कारवाई करीत असल्याची प्रतिक्रिया उमटत आहेत.

Exit mobile version