मुशेत नदीला पूर

। सोगाव । वार्ताहर ।

हवामान खात्याने दिलेल्या मुसळधार पावसाच्या इशार्‍यानुसार सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास आलेल्या पावसाने अलिबाग तालुक्यात दाणादाण उडवुन दिली आहे. या पावसामुळे मध्यरात्री 3 च्या सुमारास मुशेत नदीला पूर येऊन नदीचे पाणी गावातील घरांत शिरले. यावेळी काही ग्रामस्थांचे संसारपयोगी वस्तू भिजून नुकसान झाले. तर, मुशेत येथील एका शेतकर्‍याची म्हैस पुराच्या पाण्यात वाहून गेली. तसेच, येथील प्रसिद्ध असलेल्या दर्ग्यात पुराचे पाणी जाऊन दर्ग्याचे मोठे नुकसान झाले आहे.

सोमवारी सकाळी काहीसा पूर ओसरल्यानंतर रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष सुनिल थळे, माजी ग्रामपंचायत सदस्य अण्णा सातमकर, अनिल जाधव, सामाजिक कार्यकर्ते सज्जाद सय्यद, सचिन घाडी, सूचित थळे, अक्षय जाधव, ग्रामविकास अधिकारी माधुरी भोईर, तलाठी श्री. हांगे यांनी पूरपरिस्थितीची पाहणी केली व प्रशासन आपल्या सोबत असल्याचा दिलासा दिला.

मात्र, यावेळी संतप्त मुशेत ग्रामस्थांनी तलाठी यांना सांगितले की, गावाच्या परिसरात एका विकासकाने नाल्यावर बेकायदेशीर भराव करून नैसर्गिक पाण्याची वाट बंद केल्यामुळे व नदीवर अगदी गावाच्याजवळ ग्रामस्थांना विश्‍वासात न घेता बंधारा बांधल्यामुळे पुराचे पाणी गावात शिरल्याचा आरोप केला आहे. तसेच, लवकरात लवकर हा भराव काढून नाल्याची नैसर्गिकरित्या असलेली वाट मोकळी करावी, तसेच नदीवरील बांधलेला बंधारा त्वरित काढावा, अन्यथा यापुढे पुन्हा नदीला पूर येवून जीवितहानी व वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, तरी प्रशासनाने त्वरित पंचनामे करून आमचे नुकसान भरून द्यावे, असे तलाठी यांना सांगितले.

Exit mobile version