वाद्य वाटप वादाच्या भोवऱ्यात

जिल्हा परिषदेवर पडणार आर्थिक भार

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

जिल्हा परिषदेकडून देण्यात आलेल्या वाद्यांचा दर्जा चांगला नसल्याचा वाद निर्माण होत असताना वाद्य वाटप वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. निवडलेल्या लाभार्थ्यांपैकी वाद्य कोणाला दिले, याची माहितीच घेण्यास जिल्हा परिषद उदासीन ठरले असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेवर वाद्य खरेदीचा अतिरिक्त भार पडल्याची माहिती समोर आली आहे.

भजनी मंडळाला प्रोत्साहन देण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील भजनी मंडळासाठी वाद्य देण्याचा निर्णय घेतला होता. अर्थसंकल्पात त्यासाठी 2 कोटी 40 लाख रुपयांची तरतूद केली होती. त्यानुसार रायगड जिल्ह्यातील भजनी मंडळांची माहिती घेण्यात आली. एकूण 1 हजार 200 लाभार्थ्यांना लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला. सोलापूरमधील एजन्सीला वाद्य पुरवठ्याचा ठेका देण्यात आला. विधानसभा मतदार संघ स्तरावर वाद्य वाटपाचा कार्यक्रम जिल्हा परिषदेकडून करण्यात आला. मात्र, हे वाद्य दर्जाहीन असल्याचा आरोप अनेकांनी केला. त्यामुळे हा वाद मोठ्या प्रमाणात निर्माण झाला होता. हा वाद संपण्याच्या वाटेवर असताना आता वाद्य वाटप करताना लाभार्थ्यांची माहितीच घेण्यास जिल्हा परिषद उदासीन ठरले. त्यामुळे कोणाला वाद्य दिले याची माहितीच जिल्हा परिषदेकडे उपलब्ध झाली नाही. त्याचा परिणाम वाद्यांचा तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे जिल्हा परिषदेला साधारणपणे शंभरहुन अधिक वाद्य ठेकेदाराकडून मागविण्याची वेळ आली.

पनवेल, उरण इत्यादी तालुक्यातील साडेतीनशे मंडळांना वाद्य देण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. मात्र, हे वाद्य देताना त्याची पोहच घेण्यास प्रशासन उदासीन ठरले. त्यामुळे शंभर भजनी मंडळाला वाद्य देण्यासाठी जिल्हा परिषदेवर वाद्य खरेदीचा अतिरिक्त भार पडल्याची माहिती समोर आली आहे. अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेल्या निधी पेक्षा अधिक वाद्य खरेदीचा खर्च जिल्हा परिषदेवर पडणार आहे. सोलापूर येथील एजन्सीकडून अद्याप खर्चाचा अहवाल दिला नाही. त्यामुळे किती अधिक भार पडणार हे त्यानंतर स्पष्ट होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेकडून मिळाली आहे.

रायगड जिल्हा परिषद गेल्या अनेक दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडत आहे. याच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या स्विय सहाय्यकाने बदलीच्या कामासाठी लाच मागितली होती. याप्रकरणी त्या स्विय सहाय्यकाला रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते. तसेच, भजनी मंडळाला देण्यात आलेले वाद्य दर्जाहीन असल्याचा वाद निर्माण झाला होता. मात्र, वाद्य खरेदी करण्यापुर्वी जाणकार मंडळीचा अभिप्राय घेण्यात आला, असे सांगून जिल्हा परिषदेने या वादावर पांघरून घातले. त्यानंतर आता वाद वाटप करताना भोंगळ कारभार पनवेलमध्ये झाल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद मागील अनेक दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडत आहे.

रायगड जिल्ह्यातील 1 हजार 200 लाभार्थ्यांना वाद्य देण्याची तरतूद करण्यात आली होती. पनवेलमध्ये झालेल्या कार्यक्रमात कोणाला वाद्य किती दिले, याची पोहच घेतली नाही. त्यामुळे ढोलकी वाद्य अधिक गेल्याची माहिती समोर आली. ढोलक्यांचा तुटवडा कमी झाल्याने शंभर ढोलक्या एजन्सीकडून अधिक मागविण्यात आल्या. त्याच्या खर्चाचा अहवाल अद्याप प्राप्त झाला नाही.

विशाल तनपूरे,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग
Exit mobile version