मटन-चिकन मार्केटची इमारत धोकादायक

इमारतीच्या भिंतींची पडझड सुरूच: विक्रेत्यांमध्ये घबराट

| नागोठणे | वार्ताहर |

गेल्या अनेक वर्षांपासून मोडकळीस आलेल्या व पुनर्बांधणी करण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या नागोठण्यातील मटन-चिकन मार्केट इमारतीमधील भिंतींची पडझड सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी या इमारतीच्या आणखी एका भिंतीची पडझड झाली. त्यामुळे या मटन चिकन मार्केटमधील विक्रेत्यांमध्ये घबराट पसरली आहे. तर या इमारतीचे बांधकाम होईपर्यंत लगतच्या सुक्या मासळी बाजारच्या ठिकाणी शेड करून पर्यायी व्यवस्था करण्याची मागणीही मटन- चिकन विक्रेत्यांकडून होत आहे.

नागोठण्यातील ही इमारत खूप वर्षे जुनी आहे. या इमारतीत मटन व चिकन विक्रेत्यांचे सुमारे 19 छोटे-छोटे गाळे आहेत. यांतील बहुतांश गाळ्यांमध्ये चिकन-मटन विक्रीची दुकाने आहेत. या विक्रेत्यांकडून ग्रामपंचायत दररोज 20 रुपयांची कर पावती फाडत आहे. याच इमारतीच्या पूर्वेकडील बाजूला ग्रामपंचायतीने येथील स्थानिक बेरोजगार तरुणांना व्यवसाय करण्यासाठी गाळे बांधले आहेत. नागोठण्यातील 1989 व 2005 च्या महापुरात ही इमारत पूर्णता पाण्याखाली गेली होती. त्यानंतर दरवर्षी येथील अंबा नदीला येणाऱ्या पुराचे पाणी या इमारतीच्या चारही बाजूने येत असल्याने या इमारतीचा अर्धा भाग दरवर्षी पाण्याखाली जात असतो. या इमारतीची पश्चिमेकडील भिंत कमकुवत झाल्याने त्याचा काही भाग याआधी 29 जून, 2019 रोजी कोसळला होता. त्यानंतर या इमातीमधील एक गाळेधारक चिकन विक्रेते मोहम्मद शरिफ अब्दुल कुरेशी यांच्या दुकान गाळ्याची अंतर्गत भिंत 10 नोव्हेंबर, 2023 रोजी रात्री कोसळली होती. या दुकानातील कोंबड्या असलेल्या जाळीदार गाडीवर ही भिंत पडल्याने अनेक कोंबड्या त्यावेळी मृत होऊन नुकसान झाले होते. त्यावेळी सुदैवाने रात्रीची वेळ असल्याने या दुर्घटनेत कुणीही जखमी झाले नव्हते. मात्र असे असले तरी या इमारतीच्या डागडुजीकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केल्याचा आरोप येथील विक्रेत्यांकडून होत आहे. या संदर्भात नागोठणे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक राकेश टेमघरे यांच्याशी संपर्क साधला असता नवीन बांधकामासाठी निधीची तरतूद अद्याप झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.

Exit mobile version