। नवीन पनवेल । वार्ताहर ।
पनवेल तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्त्यालगतच्या जागेवर शेकडो जणांनी अतिक्रमण केले आहे. मात्र त्यांच्यावर गेली कित्येक वर्षापासून कारवाई केली नसल्याने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कारभाराबाबत साशंकता निर्माण झाली आहे. सुकापुरपासून पुढे रस्त्यालगत हजारो अतिक्रमणे असताना देखील सार्वजनिक बांधकाम विभागाने केवळ 132 जणांना नोटीसा पाठवल्या आहेत.
पनवेल परिसर झपाट्याने बदलत चालला आहे. सुकापूर, आकुर्ली, चिपळे, नेरे आदी परिसरात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती देखील वाढत चालली आहे. त्याचा परिणाम येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्त्यालगत अनेक हातगाड्या, लाद्यांच्या दुकानापासून बेड, सोफा, बेकायदेशीर घरे, पक्की बांधकामे, गाड्या धुण्याचे सेंटर, मटन, चिकन दुकाने, पाणीपुरी स्टोल उभारले गेले आहेत.
मात्र सार्वजनिक बांधकाम खात्याचे या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. या रस्त्याला माथेरान रस्ता असे संबोधले जाते. सुकापूर गावापासूनचा परिसर नैना मध्ये येत असून आकुर्ली, चिपळे, कोप्रोली आदी परिसरात सार्वजनिक बांधकाम खात्याच्या जागेवर अतिक्रमणे उभी राहिली आहेत. यातील बहुतांशी परप्रांतीय आहेत. त्यांच्याकडून काही नागरिक भाडे वसूल करत असल्याचे समोर आले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे माथेरान रस्त्यावरील जागा 1965 ते 1970 च्या दरम्यान हस्तांतर केली असल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र अनेक ठिकाणी अतिक्रमणे झालेली दिसत आहे. यावर कारवाई करण्यात येत नाही. आजतोगायत सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत कारवाई करण्यात आलेली नसल्याने अतिक्रमणांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कित्येक वर्षापासून या जागेवर अतिक्रमणे केलेली असल्यामुळे ही अतिक्रमणे केली जात असताना सार्वजनिक बांधकाम खाते हातावर हात ठेऊन गप्प बसले आहे. रस्त्यालगतच्या जागा अनेक धनदांडग्यानी बळकावल्या आहेत. यात सार्वजनिक बांधकाम खात्याची जागा देखील सोडण्यात आलेली नाही. या जागेचा खासगी वापर केला जात आहे. मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.