‌‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियान

उपचारांपेक्षा आजार होऊच नयेत यावर विशेष भर

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

ग्रामीण भागातील आरोग्य सेवा मजबूत करण्याबरोबरच स्वयंपुर्ण ठेवण्यासाठी आरोग्य विभागाने पुढाकार घेतला आहे. रायगड जिल्ह्यात बुधवार दि.1 एप्रिलपासून ‌‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव हे अभियान सुरु करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत बुधवारी विशेष आरोग्य ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले असून 31 मार्च 2027 पर्यंत हे अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

रायगड जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या अखत्यारित 55 आरोग्य केंद्रांसह 288 उपकेंद्र आहेत. जिल्हा परिषदेचे दवाखानेदेखील आहेत. परंतु, अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे गावे, वाड्यांपर्यंत आरोग्य सेवा पोहचत नसल्याच्या तक्रारी कायमच आहे. त्यामुळे तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी उपचारासाठी नागरिकांना जावे लागते. ही समस्या कायमची सोडविण्यासाठी आरोग्य विभागाने पुढाकार घेतला आहे. ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्यमा उंचावणे, प्रतिबंधात्मक व प्रोत्साहनात्मक आरोग्य सेवांना चालना देणे, आरोग्यविषयक सामाजिक वर्तणुकीत बदल व आरोग्यदायी जीवनशैली रुजवण्यासाठी ‌‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियान सुरु करण्यात आले आहे.

सार्वजनिक स्वच्छता, पाणीपुरवठा, सामाजिक प्रबोधन यासह ग्रामीण भागातील विविध घटकांच्या समन्वयाने आरोग्यदायी गाव बनवणे, हे या अभियानाचे मुख्य उद्दीष्ट आहे. या अभियानांतर्गत उपचारांपेक्षा आजार होऊच नयेत याबाबतच्या उपायययोजनांवर विशेष भर देण्यात येणार आहे. संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण कमी करणे, माता-बाल आरोग्य सुधारणे, पोषण, स्वच्छता, सुरक्षित पाणी, सांडपाणी व्यवस्थापन आणि मानसिक आरोग्य यांचा समावेश या मोहिमेत करण्यात आला आहे. माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व ग्रामपंचायतींना जिल्हा परिषद प्रशासनाकडून सूचना दिल्या आहेत. आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार गावांचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. एकूण गुणांपैकी 70 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या गावांना आरोग्य संपन्न गाव म्हणून घोषित करण्यात येईल. या गावांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व रोख पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Exit mobile version