म्यानमार भूकंपानं हादरलं

इमारती, पूल कोसळले, घरांना तडे; बँकॉकमध्ये आणीबाणी

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

म्यानमार आणि थायलंड शुक्रवारी शक्तीशाली भूकंपाने हादरले आहे. 7.7 रिक्टर स्केलच्या भूकंपामुळे दोन्ही देशांमध्ये मोठी हानी झाली आहे. अनेक निर्माणाधीन इमारती, पूल कोसळले आहेत. घरांच्या भिंतीलाही तडे गेले असून, रस्त्यांनाही भेगा पडल्या आहेत. काही लोक बेपत्ता असल्याचेही वृत्त आहे. या भूकंपानंतर जनजीवन विस्कळीत झाले असून, थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. शहरात लॉकडाऊन लावण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी म्यानमारमध्ये शक्तिशाली भूकंप झाला. म्यानमार हे भूकंपाचे केंद्र आहे. या भूकंपाची तीव्रता एवढी होती की म्यानमारमधील मंडाले येथील इरावती नदीवरील जगप्रसिद्ध एवा पूलही कोसळल्याचे वृत्त आहे. तसेच चीन, तैवान आणि बांगलादेशच्या काही भागातही या भूकंपाचे धक्के जाणवल्याचे वृत्त आहे.

7.7 एवढ्या तीव्रतेच्या भूकंपामुळे थायलंड आणि म्यानमारमधील अनेक इमारती अक्षरश: पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या. बँकॉकमध्ये निर्माणाधीन टॉवर्सही कोसळले असून, एकाचा मृत्यू तर जवळपास 50हून अधिक लोक बेपत्ता झाले आहेत.

बँकॉकमध्ये आणीबाणी
थायलंडची राजधानी बँकाकमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे. संपूर्ण शहर लॉकडाऊन करण्यात आले असून, मेट्रो सेवाही बंद करण्यात आल्या आहेत. शेअर बाजारातील ट्रेडिंगही थांबवण्यात आले असून, विमानतळ आणि सब वेदेखील बंद करण्यात आले आहेत.
प्रसिद्ध एव्हा ब्रिजदेखील वाहून गेला
भूकंपाच्या झटक्यांनी म्यानमाराच्या मांडलेय येथे इरावडी नदीवरील प्रसिद्ध एव्हा ब्रिजदेखील वाहून गेला आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी विभागाने दिलेल्या माहितीनुसार भूकंपाच्या पहिल्या धक्क्याची तीव्रता 7.2 रिश्टर स्केल होती तर दुसर्‍या धक्क्याची तीव्रता 7.7 इतकी होती.
अनेक लोक इमारतीत अडकले
बँकॉकमधील एका 30 मजली इमारतीत किमान 67 लोक अडकल्याचे वृत्त आहे. जेव्हा भूकंप झाला तेव्हा इमारतीत बांधकाम चालू होते. भूकंपाच्या केंद्रापासून 800 मैल अंतरावर असलेल्या थायलंडच्या राजधानीत पहिल्या भूकंपाच्या झटक्यानंतर स्थानिक लोक प्रचंड घाबरले आणि त्यांनी त्यांच्या इमारतींमधून रस्त्यावर धाव घेतली आहे.
Exit mobile version