डांबरीकरण उखडले, स्थानिकांची तक्रार
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील शेलू-निकोप-मोहिली तर्फे वरेडी या गावांना जोडणार्या उल्हास नदीवरील नव्याने झालेल्या पुलाचे लोकार्पण झाले होते. या पुलाच्या स्लॅबवरील काँक्रिटला तडे गेले आहेत, तसेच डांबरीकरणदेखील खराब झाले आहे. याबाबत स्थानिकांनी संबंधित विभागाकडे तक्रार केली असून, ठेकेदारावर कारवाईची मागणी केली आहे.
कर्जत तालुक्यातील शेलू आणि मोहिली तर्फे वरेडी हे अंतर कमी करण्यासाठी उल्हास नदीवर नवीन पूल बांधण्यात आला. या ठिकाणी नव्याने शासनाकडून नाबार्ड अर्थसहाय्यीत अंतर्गत पूल मंजूर करण्यात आला होता. या नव्या पुलासाठी 4 कोटी 94 लाख रुपयांचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खर्च करण्यात आला आहे. हा पूल काही दिवसांपूर्वी स्थानिक आ. महेंद्र थोरवे यांच्या उपस्थित खुला झाला होता. या पुलाचे डांबरीकरण खराब झाले असून पुलाच्या स्लॅबला तडे गेले असल्याचा दावा केला आहे. पुलाचे काम सुरू असताना ठेकेदारांनी नदी पात्रात जे दगड मातीचा भराव टाकून बांध उभे केले आहेत, तो बांधदेखील तसाच ठेवून दिल्याने पावसाळ्यात पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. ठेकेदार हा निघून गेला असल्याचा आरोप शेलू गावातील ग्रामस्थ अक्षय हिसालगे, ग्रामपंचायत सदस्य महेश खारीक, मंगेश बोराडे, जयराम मसणे, नागेश मसणे, तुषार मसणे, भगवान बोराडे, जयेश मसणे, मनोज शेकटे, विक्रांत कुंभार, योगेश मसणे यांच्याकडून करण्यात आला आहे.