पिगिंग प्रक्रियेदरम्यान स्फोट; सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणी
। उरण । प्रतिनिधी ।
जेएनपीए बंदरातील जेएसडब्ल्यूच्या लिक्विड जेट्टीवर रविवारी (दि.14) सकाळी झालेल्या भीषण दुर्घटनेत दोन कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. तेलवाहिनी स्वच्छ करण्याच्या ‘पिगिंग’ प्रक्रियेदरम्यान झालेल्या स्फोटामुळे बंदर परिसरात खळबळ उडाली असून, औद्योगिक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जेएनपीए बंदरात उभ्या असलेल्या ऑईल जहाजातील माल खाली केल्यानंतर तेलवाहिनी स्वच्छ करण्याचे काम सुरू होते. रविवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ‘पिगिंग’ प्रक्रियेदरम्यान अचानक पाईपलाईनमध्ये प्रचंड दाब निर्माण होऊन भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत ओरिएंट कंपनीचे कर्मचारी जगन्नाथ गावंड (55) रा. पिरकोन, उरण आणि बेंजोप्लास्ट कंपनीचे लोडिंग मास्टर राजेंद्र शिंदे (35) मूळ रा. लांजा, जि. रत्नागिरी यांचा जागीच मृत्यू झाला. स्फोट इतका भीषण होता की दोन्ही कर्मचाऱ्यांना बचावाची संधी मिळाली नाही. घटनेनंतर सहकारी कर्मचाऱ्यांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. मात्र, दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या दुर्घटनेमुळे मृतांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान, या घटनेनंतर सुरक्षाव्यवस्थेवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. काम सुरू करण्यापूर्वी आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या होत्या का? पाईपलाईनमधील दाबाची योग्य तपासणी झाली होती का? कामगारांना आवश्यक सुरक्षा साधने आणि प्रशिक्षण देण्यात आले होते का? याबाबत चौकशीची मागणी होत आहे.
अपघातामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून तांत्रिक बिघाड की सुरक्षेतील त्रुटी याचा तपास सुरू आहे. न्हावा-शेवा पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. या दुर्घटनेनंतर जेएनपीए बंदर परिसरातील औद्योगिक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बंदर परिसरात मोठ्या प्रमाणावर धोकादायक व तांत्रिक स्वरूपाची कामे सुरू असतात. त्यामुळे कामगारांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक असून, सुरक्षा यंत्रणांच्या कार्यक्षमतेची कसून तपासणी करण्याची मागणी होत आहे.







