अतिसुरक्षित हेलिकॉप्टर्सच्या अपघातांचं गूढ

अजय तिवारी 

जगात अतिमहत्त्वाच्या व्यक्ती प्रवासासाठी वापरत असलेल्या हेलिकॉप्टरचाच वारंवार अपघात होत असल्याचं दिसतं. त्यामुळे ही हेलिकॉप्टर खरंच सुरक्षित आहेत का आणि त्यात उच्चपदस्थांनी प्रवास करणं कितपत संयुक्तिक आहे, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. अर्थातच तांत्रिक बिघाड या मुद्द्यापलिकडचे कळीचे ठरणारे अचानक बिघडणार्‍या हवामानासारखे विषयही महत्वाचे आहेत.

कोणत्याही देशासाठी प्रमुख राजकीय नेते आणि संरक्षण विभागाच्या प्रमुखांची सुरक्षा महत्त्वाची असते. त्यांच्या सुरक्षेसाठी काही नियम केलेले असतात. ते पाळले नाही की काय होतं हे कुन्नूरमधल्या परवा जनरल बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघाताच्या घटनेतून पुढे आलं. शत्रूराष्ट्राच्या कारवाईची भीती आणि अपघातात एकाच वेळी अनेक महत्त्वाचे नेते, अधिकारी गमावले जाऊ नयेत, म्हणून एकाच वेळी, एकाच वाहनातून प्रवास न करण्याचा राजशिष्टाचार आहे. तो पाळला जाणं आवश्यक असतं. तसंच अशा नेत्याच्या किंवा संरक्षण दलाच्या वरिष्ठांच्या प्रवासाच्या वेळी ते वापरलं जाणारं वाहन, हेलिकॉप्टर सुरक्षित आहे का, उड्डाणापूर्वी त्याची तपासणी झाली आहे का, ते ज्या भागात जाणार, तिथलं हवामान कसं आहे, त्या भागाची भौगोलिक रचना कशी आहे आदींची माहिती घेतली जाते. उच्चपदस्थ नेते, संरक्षण दलाचे अधिकारी एका हेलिकॉप्टरमधून प्रवास करतात तेव्हा त्यांच्यासोबतच आणखी एक हेलिकॉप्टर दिलं जातं. असं असताना कुन्नूरच्या घटनेत त्रुटी कशा राहिल्या, असा प्रश्‍न उपस्थित होतो. ढग खाली आले असल्यास, दृश्यमानता कमी झाली असल्यास काय करावं लागतं आणि अपघात कसा टाळता येतो, हे शरद पवार यांच्यासारख्या नेत्यानं अनुभवलं असताना सरसेनाध्यक्ष प्रवास करत असलेल्या हेलिकॉप्टरच्या बाबतीत ते का उलगडलं नाही, या प्रश्‍नाचंही उत्तर मिळायला हवं.
या गंभीर घटनेनंतर रावत आणि अन्य उच्चाधिकारी प्रवास करत असलेल्या एम आय-17 व्ही 5 हेलिकॉप्टरच्या सुरक्षिततेची चर्चा सुरू झाली आहे. वायूदलातलं हे हेलिकॉप्टर रशियन निर्मित असून अत्यंत सुरक्षित आणि सर्वश्रेष्ठ समजलं जातं. हे एम आय- 8/17 या हेलिकॉप्टरच्या श्रेणीचाच भाग आहे. हे हेलिकॉप्टर अत्याधुनिक तंत्रज्ञानाने आणि शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असं समजलं जातं. त्यामुळे सैन्यातल्या बड्या अधिकार्‍यांच्या वाहतुकीसाठी याचा वापर केला जातो. तसंच शोध मोहीम, गस्त घालणं, मदत आणि बचाव कार्य या कामांसाठीही या हेलिकॉप्टरचा वापर केला जातो. अगदी पंतप्रधान, राष्ट्रपतींसह अनेक उच्चपदस्थ याच हेलिकॉप्टरचा वापर करतात. भारतातच नव्हे तर जगात अनेक ठिकाणी या हेलिकॉप्टरचा वापर केला जात आहे. तिथेही उच्चपदस्थांसाठी हेच हेलिकॉप्टर सुरक्षित मानलं जातं. मिग विमानाच्या सुरक्षिततेचा मुद्दा जसा काही काळापूर्वी पुढे आला होता, तसाच तो आता एमआय 17 व्ही पाचच्या सुरक्षिततेबाबत समोर आला आहे. परिणामी, ही हेलिकॉप्टर्स खरंच किती सुरक्षित आहेत, याचा गांभीर्यानं विचार करण्याची वेळ आली आहे.
भारतात आणि जगात एमआय 17 व्ही 5 आणि त्याच्या श्रेणीतली हेलिकॉप्टर्स जेवढी अत्याधुनिक समजली जातात, तेवढीच धोकादायकदेखीलही आहेत. गेल्या पाच वर्षांमध्ये एम-17 हेलिकॉप्टर्सचे सहा अपघात झाले असून तब्बल 28 जणांना जीव गमवावा लागला आहे. 6 मे 2017 रोजी अरुणाचल प्रदेशमधील तवांगजवळ हवाई दलाचं एमआय-17 हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं होतं. या अपघातात पाच जवानांचा अपघाती मृत्यू झाला. इतर दोन जणांचाही मृत्यू झाला. हवाई दलाच्या माहितीनुसार, या हेलिकॉप्टरने सकाळी सहा वाजता उड्डाण केलं होतं. त्यानंतर काही वेळातच ते दुर्घटनाग्रस्त झालं होतं. 3 एप्रिल 2018 रोजी उत्तराखंडमधील केदारनाथमध्ये एमआय-17 हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं. गुप्तकाशीवरुन बांधाकामाचं साहित्य घेऊन येणारं हे हेलिकॉप्टर हेलिपॅडवर उतरण्यापूर्वी 60 मीटर अंतरावरच दुर्घटनाग्रस्त झालं. या हेलिकॉप्टरमधून सहाजण प्रवास करत होते. यापैकी एकजण किरकोळ जखमी झाला तर इतर सर्वजण सुरक्षित बचावले. 27 फेब्रुवारी 2019 रोजी सकाळी 10 वाजता जम्मू-काश्मीरमधल्या बडगाम जिल्ह्यात एमआय-17 हेलिकॉप्टरचा अपघात झाला. या दुर्घटनेत हवाई दलातल्या सहा अधिकार्‍यांसह एका नागरिकाचा मृत्यू झाला. हा अपघात निष्काळजीपणामुळे घडला असल्याचं चौकशीत स्पष्ट झालं. या वेळी काही अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात आली होती. कोणत्याही मोठ्या अपघातानंतर चौकशी होते. त्यात काही शिफारसी केलेल्या असतात. या शिफारशींचं नंतर काय होतं, हा प्रश्‍न कायम अनुत्तरीत राहतो. ‘पुढच्यास ठेच, मागचा शहाणा’ असं कधीच त्यातून होत नाही आणि पुढचा अपघात होईपर्यंत मागची घटना विसरून गेलेली असते. 2018 नंतर 2019 मध्येही केदारनाथमध्येच एमआय-17 हेलिकॉप्टरचा अपघात झाला. 23 सप्टेंबर 2019 रोजी सकाळी उड्डाण करताना हेलिकॉप्टर कोसळलं. सुदैवानं अपघातात हेलिकॉप्टरच्या पायलटसह सहाजण बचावले. गेल्याच महिन्यात 18 नोव्हेंबरला एमआय17 व्ही हे हेलिकॉप्टर लँडिंगदरम्यान अरुणाचल प्रदेशमध्ये कोसळलं. सुदैवानं यामधून प्रवास करणारे पाच क्रू मेंबर्स बचावले. त्यांना किरकोळ जखमा झाल्या. अपघातांची ही मालिका पाहता त्यात मानवी दोष किती, हवामानाचा दोष किती आणि तांत्रिक अडचणी किती याचा तपास करायला हवा. जगातल्या सर्वात प्रगत वाहतूक हेलिकॉप्टर्समध्ये एमआय-17-व्ही-5 चा समावेश होतो. समुद्रातलं वातावरण आणि वाळवंटातल्या वेगळ्या परिस्थितीमध्येसुद्धा उड्डाण करण्याच्या दृष्टीनं या हेलिकॉप्टरची निर्मिती करण्यात आली आहे.
हवाई दल याचा वापर व्हीआयपी चॉपर म्हणून करतं. तसंच भारतातल्या ‘व्हीव्हीआयपी’ व्यक्तींच्या उड्डाणांकरता या हेलिकॉप्टरचा वापर होतो. हवाई मार्ग नसणार्‍या ठिकाणी ‘व्हीआयपी’ व्यक्तींचा प्रवास याच हेलिकॉप्टरद्वारे पार पडतो, असं सांगितलं जातं. जनरल रावत ज्या एमआय-17 व्ही 5 हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते, ते भारतीय हवाई दलाच्या सेवेतलं रशियन बनावटीचं हेलिकॉप्टर आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये एमआय-17 व्ही 5 गटातल्या हेलिकॉप्टर्सना झालेले अपघातही चर्चेत आले होते. त्यानंतर भारतीय हवाई दलाने एप्रिल 2019 मध्ये एमआय 17 व्ही-5 हेलिकॉप्टर्सच्या रिपेअरिंग आणि देखरेखीसाठी चंदीगडमध्ये एक केंद्रही स्थापन केलं होतं. भारतासह रशिया, इराण आणि इतर देशांमध्ये या हेलिकॉप्टर्सचा वापर केला जातो. अमेरिकन सैन्यानेही या हेलिकॉप्टर्सचा वापर केला आहे. अफगाणिस्तान आणि इराकमध्येही त्यांचा वापर झाला आहे. मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने या हेलिकॉप्टर्सना काही वेळा अपघातांना सामोरं जावं लागलं होतं. भारतात गेल्या काही वर्षांमध्ये झालेल्या अपघातांमुळे एमआय-17 व्ही 5 हेलिकॉप्टर्स चर्चेत आली होती. सर्रास वापर होत असल्यानेच अपघातांमध्येही या हेलिकॉप्टर्सचं नाव येणं साहजिक असल्याचं तज्ज्ञ सांगतात. लष्करी अधिकार्‍यांना हेलिकॉप्टर प्रवासासाठी काही नियम करण्यात आले आहेत, त्यात  दोनपेक्षा जास्त जनरल रँकचे अधिकारी एकत्र प्रवास करू शकत नाहीत, दोन इंजिन असलेलं हेलिकॉप्टर प्रवासासाठी आवश्यक, सुरक्षा तपासणी अत्यंत महत्त्वाची, ठराविक आणि ठरलेल्या वेळीच प्रवासाची परवानगी अशा नियमांचा समावेश असून ही वेळ बदलली जात नाही. हवामान आणि ठराविक काळाप्रमाणे प्रवास निश्‍चित असतो. ज्या ठिकाणी उतरणार किंवा जिथून उड्डाण घेणार त्या ठिकाणी पुरेसा इंधनसाठा असावा, आपत्कालीन परिस्थितीत हवाई रुग्णवाहिका आणि वैद्यकीय मदतीची तयारी असावी असे नियम असताना सरसेनाध्यक्षांच्या कुन्नूर अपघाताचा आढावा घेताना या नियमाची चोख अंमलबजावणी झाली होती का, असा प्रश्‍न पडतो.  

Exit mobile version