२० जणांच्या उपस्थितीत होणार उद्या एन. डी. पाटील यांचा अंत्यविधी

। कोल्हापूर । प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांचे आज १७ जानेवारी रोजी कोल्हापुरात खासगी रुग्णालयात वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले. कोरोनाच्या नियमांमुळे अंत्ययात्रा निघणार नसून एन.डी. पाटील यांचे उद्या (१८ जानेवारी) कोल्हापुरमधील राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजच्या मैदानावर सकाळी ८ ते २ या वेळेत अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात येणार आहे. तसेच एन.डी.पाटील समाजवादी प्रबोधिनीचे व अंधश्रद्धा निर्मूलन प्रबोधन व विवेकवादी चळवळीचे अग्रणी असल्याने कोणत्याही कर्मकांडाशिवाय त्यांचा अंत्यविधी होणार आहे. कोरोनाच्या नियमांमुळे केवळ २० जणांच्या उपस्थितीत अंत्यविधी होणार आहे. तरी कार्यकर्त्यांनी शाहू कॉलेजवर अंत्यदर्शनासाठी यावे मात्र अंत्यविधीच्या ठिकाणी गर्दी करू नये तसेच मास्क, फिजिकल डिस्टनसिंग आणि महाविद्यालय परिसरात पार्किंग नियमांचे पालन करावे, असे आवाहन एन.डी. पाटील यांच्या पत्नी सरोजताई उर्फ माई पाटील व कुटुंबियांनी केले आहे.

Exit mobile version