पार्किंगसाठी जागा उपलब्ध करावी
| उरण | वार्ताहर |
उरण शहरात वाहन पार्किंग करण्यासाठी आरक्षित असलेले भूखंड गायब झाल्याचे दिसत आहेत. त्यामुळे उरणकरांना पार्किंग करण्यासाठी नगरपालिकेकडे जागा नसल्यानेच प्रामुख्याने शहरात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. ही अडचण लक्षात घेता नगरपालिका प्रशासनाने पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
नगरपालिकेच्या वतीने शहरात येणार्या वाहनांना पार्क करण्यासाठी पार्किंग झोन आरक्षित भूखंड असतो. मात्र, उरण नगरपालिकेचा पार्किंग झोन असलेला भूखंडच गायब झाला आहे. सदरचा भूखंड बिल्डरच्या घशात तत्कालीन सत्ताधारी व नगरपालिका प्रशासनाने घातला आहे, असा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे उरण शहरात नगरपालिकेची स्वतःची अशी पार्किंग व्यवस्था उपलब्ध नाही, असे बोलले जात आहे.
पार्किंग व्यवस्था नसल्याने शहरात येणारे वाहन चालक ज्या ठिकाणी मोकळी जागा मिळेल त्याठिकाणी पार्क करून मोकळे होतात. तसेच शहरातील प्रमुख नाके, हॉटेल, ज्वेलर्स, स्वीट, कपडे, किराणा दुकानासमोरच गाडी पार्क करून खरेदी करीत असतात. त्यामुळे नेहमीच शहरात वाहतूक कोंडीचा सामना आमजनतेला करावा लागत आहे. याला सर्वस्वी नगरपालिका प्रशासनच जबाबदार असल्याचे नागरिक सांगतात.
उरण नगरपालिकेने सर्वप्रथम वाहन पार्क करण्यासाठी पार्किंगसाठी भूखंड आरक्षित करावा जेणेकरून त्याठिकाणी वहान पार्किंग करणे वाहन चालकांना सोयीचे होऊन शहरातील वाहतूक कोंडीचे प्रमाण नक्कीच कमी होईल, असा विश्वास वाहनचालक व उरणची जनता करीत आहे.