नडोदे ग्रामपंचायत पोटनिवडणुक; एका जागेसाठी लढत तर एक प्रभाग बिनविरोध

। खोपोली । प्रतिनिधी ।
तालुक्यातील ग्रुपग्रामपंचायत नडोदे येथील रिक्त असलेल्या जागेसाठी पोटनिवडणुक होत असून, सर्वसाधारण जागेवर दोन वार्डात निवडणूक होत आहे. यापैकी एक प्रभाग बिनविरोध झाला आहे तर, एका प्रभागात एक जागेसाठी दोन उमेदवार आपले नशीब आजमवत आहेत.
शासनाने रद्द केलेल्या ओबीसी जागेवर सर्वसाधारण आरक्षण टाकल्याने तेथील सर्वसामान्य उमेदवाराला उभे राहण्यासाठी संधी मिळाली आहे. प्रभाग क्रमांक 1मध्ये लता विनोद फराट व सुषमा संतोष पालकर या सर्वसाधारण स्त्री राखीव जागेसाठी लढत होत आहे.
तर प्रभाग क्रमांक 3 मध्ये कल्पेश कमलाकर सुर्वे हे उभे असून, सद्यःस्थितीत ते बिनविरोध आहेत. यामुळे फक्त एकाच प्रभागात निवडणूक रंगतदार होणार असल्याचे चित्र आहे.
उर्वरित दहा महिन्यांसाठी ही पोटनिवडणूक शासनाने जाहीर केली आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाचा ओबीसी आरक्षण अद्यादेश रद्द केल्यामुळे या जागेवर सर्वसाधारण जागा घोषित करण्यात आला आहे. यामुळे अनेक वर्षानंतर येथे सर्वसामान्य जनतेला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. याच पार्श्‍वभूमीवर आगामी काळात जनता दोन उमेदवारांपैकी कोणत्या उमेदवारांच्या पारड्यात सर्वाधिक मताचे दान टाकते, हे पाहणे तालुक्यासाठी औत्सुक्याचे ठरले आहे.

Exit mobile version