चिरनेरच्या नागमूर्ती विक्रीसाठी मुंबईत दाखल

| चिरनेर | वार्ताहर |

येत्या 21 तारखेला येणाऱ्या नागपंचमीच्या निमित्ताने उरण तालुक्यातील चिरनेर कलानगर येथून तीन हजार नागमूर्ती मुंबई येथे विक्रीसाठी पाठविण्यात आल्या असल्याची माहिती नागमूर्ती तयार करणाऱ्या दीपा दीपक गोरे यांनी दिली. गेल्या अनेक पिढ्यांची परंपरा जोपासत यावर्षीही चिरनेर कलानगरीतील कुंभार समाजाच्या महिला कारागिरांनी तयार केलेल्या शेकडो नागमूर्ती मुंबई येथे तीन दिवस अगोदरच विक्रीसाठी रवाना झाल्या आहेत.

नागपंचमीच्या सणाला अनन्यसाधारण महत्त्व असल्यामुळे हिंदू संस्कृतीनुसार येथील स्त्रिया पारंपरिक वेशभूषा करून नागदेवतेची मूर्ती घरी आणून, पाटावर ठेवून तिची विधीवत पूजा करतात. ग्रामीण भागातल्या स्त्रिया तर अजूनही शेतावरच्या नागदेवतेच्या स्थानावर जाऊन, या नागदेवतेची विधीवत पूजा करतात. यावेळी रानातल्या नागवेलीला महत्त्व देऊन, त्या नागवेलीचीदेखील महिला मनोभावे पूजा करतात. यावेळी मानाचा नारळ, पुष्पहार, दूध, पेढे आणि लाह्या या देवतेला प्रसाद म्हणून अर्पण करतात.

गणेशमूर्ती, नागमूर्ती, मातीची भांडी तयार करण्याचा आमच्या कुंभार समाजाचा पारंपरिक व्यवसाय असून, हिंदू संस्कृतीच्या सण उत्सवांमुळे या धंद्यात चार पैसे मिळतात. मात्र मेहनत खूप करावी लागते. दोन महिने आधीपासून आम्ही नागमूर्ती तयार करण्याच्या कामाला सुरुवात करतो. लहान-मोठ्या नागमूर्ती या किरकोळ भावाच्या दराने शंभर ते पन्नास किंवा चाळीस रुपये या दराने विकल्या जातात. तर होलसेलचा रेट हा कमी असतो.

दीपा दिपक गोरे, नागमूर्ती कारागीर, चिरनेर कलानगर
Exit mobile version