| चिरनेर | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या चिरनेर कातळपाडा गावात 14 मे रोजी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती येथील छावा प्रतिष्ठानच्यावतीने साजरी करण्यात आली. यावेळी शंभुराजांना अभिवादन करीत मानाचा मुजरा करण्यात आला. याप्रसंगी पुष्पवृष्टीचा वर्षाव करण्यात आला.
हर हर महादेव, जय भवानी, जय शिवराय, छत्रपती संभाजी महाराज की जय असा जयघोष, भगवे झेंडे, अश्वनृत्य लेझीम,आणि ढोल ताशांचा गजर यामुळे पुन्हा एकदा इतिहास जिवंत झाला. ऐतिहासिक शिवथाटात साजर्या करण्यात आलेल्या शंभू राजांच्या जयंतीला शिवकालीन स्वरूप प्राप्त झाले होते. त्यामुळे चिरनेर गावात जणू शिवसृष्टी अवतरली होती. छावा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुभाष कडू यांच्या कल्पकतेतून साजर्या करण्यात आलेल्या धर्मवीर शंभूराजांच्या जयंतीच्या सोहळ्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. आरंभी छत्रपती शंभुराजांच्या प्रतिमेचे विधीवत पूजन, जन्मोत्सव व पाळणा गीत सादर करण्यात आले. त्यानंतर श्री सत्यनारायणाची महापूजा आणि सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांना भगवे फेटे देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली होती. शिवकालीन वेशभूषा परिधान करून मिरवणुकीत सहभागी झालेल्या तरुण-तरुणी, बच्चेकंपनी आणि महिला, पुरुषांमध्ये यावेळी उत्साह संचारला होता. मिरवणुकीची शोभा वाढविण्यासाठी, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ, महाराणी येसूबाई या महान स्त्री-पुरुषांच्या साकारलेल्या व्यक्तिरेखा दिसून येत होत्या. सोबत हरीपाठातून संतांच्या नावाचा गजर होत होता. त्यामुळे वारकरी या भक्तीत तल्लीन झालेले दिसत होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी छावा प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी सदस्य व ग्रामस्थ, राजकीय नेतेमंडळी, मित्रपरिवार तसेच हितचिंतक या सर्वांनी परिश्रम घेतले.