गटविकास अधिकार्यांच्या सूचना
| नेरळ | प्रतिनिधी |
देशात युद्धसदृश्य परिस्थिती असून, त्या काळात तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींचे अधिकारी तसेच महसूल विभागाचे अधिकारी यांनी कशाप्रकारे सज्ज राहावे यासाठी आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत आपत्ती काळात वेगाने पावले उचलावी, असे आवाहन गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांनी केले. तर, आपत्ती काळात कशाप्रकारे आपत्तीला सामोरे जावे याबद्दल नागरी संरक्षण दलाकडून मार्गदर्शन करण्यात आले.
रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड अलिबाग यांनी उपनियंत्रक नागरी संरक्षण दल उरण यांचे पथकामार्फत कर्जत येथे आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा घेण्यात आली. एकदिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन कर्जत पंचायत समिती सभागृह येथे आयोजित केले होते. सुरुवातीला प्रास्ताविक नायब तहसीलदार सचिन राऊत यांनी केले. नागरी संरक्षण दल उरणचे प्रशिक्षक एम.के. म्हात्रे यांच्याकडून सहभागी शिबिरार्थीं यांना मार्गदर्शन केले. सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत कोणकोणत्या उपाययोजना राबवाव्यात याबाबतीत तंत्रशुद्ध मार्गदर्शन करताना दृकश्राव्य प्रणालीचा वापर केला. आपत्तीचे विविध प्रकार विस्तृतपणे समजावून सांगताना प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण दिले.प्रथमोपचार आणि कोणत्या प्रसंगी कसे मदतकार्य करायचे याबाबतीत प्रशिक्षणार्थींना सहभागी करून मार्गदर्शन केले.
कोणत्याही आपत्तीला सामोरे जाण्यासाठी मनाच्या तयारी सोबत तांत्रिक बाबींचे ज्ञान असणे आवश्यक असल्याने अशा शिबिराचे आयोजन केल्याचे कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांनी सांगितले.या शिबिरातील कर्जत तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती मधील ग्रामपंचायत अधिकारी, तालुक्यातील महसूल विभागाचे मंडळ अधिकारी, तलाठी तसेच आपदा संस्थेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.