| नागोठणे | वार्ताहर |
रोहा तालुक्यासह नागोठणे विभागातील श्री संत सेवा मंडळाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या हरिनाम सप्ताहाची सांगता झाली. येथील ज्ञानेश्वर मंदिरात परमपूज्य स्वानंद सुखनिवासी गुरुवर्य गणपतबाबा अलिबागकर महाराज, परमपूज्य स्वानंद सुखनिवासी गुरुवर्य धोंडु महाराज कोल्हाटकर व स्वानंद सुखनिवासी गोपाल महाराज वाजे यांच्या कृपाशीर्वादाने तसेच, गुरुवर्य नारायणदादा वाजे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित अखंड हरिनाम सप्ताह सोहळा भाविकांच्या उपस्थितीत, हरिनामाच्या गजरात व मोठ्या भक्तिभावाने उत्साहात पार पडला.
या अखंड हरिनाम सप्ताहात दररोज काकड आरती, ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीचे पारायणनंतर प्रवचन, हरिपाठ व कीर्तन यानंतर भजन व जागर अशा विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे नागोठणे नगरी हरीनामाच्या गजराने अवघी दुमदुमून गेली होती. शुक्रवारी (दि.15) सकाळी 9.30 ते 11.30 दरम्यान पंढरपूर येथील मठाधिपती नारायणदादा वाजे महाराज यांचे काल्याचे कीर्तन होऊन यानंतर अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याच्या निमित्ताने हरिनाम गजरात दिंडी सोहळा संपन्न झाला. दरम्यान, पालखी दिंडी ज्ञानेश्वर मंदिरापासून पोस्ट कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज पेठमार्गे पुन्हा मंदिरात आणली. यावेळी या पालखी दिंडीचे नागोठणे सरपंच सुप्रिया संजय महाडिक व सर्व सदस्य तसेच, कर्मचार्यांनी स्वागत करत दर्शन घेतले. हा सोहळा संपन्न होण्यासाठी श्री संत सेवा मंडळाच्या सर्व पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थांनी मेहनत घेतली.