| नागोठणे | प्रतिनिधी |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारधारेवर चालणारा पक्ष असल्याने महाराष्ट्राचा विकास हाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजेंडा आहे. याच अजेंड्यावर पक्ष कालही काम करीत होता, आजही करीत आहे व उद्याही करणार आहे. लाडक्या बहिणींना समाजात प्रतिष्ठा मिळवून देण्यासह शेतकऱ्यांचे, श्रमजीवी, कष्टकरी जनतेचे प्रश्न सोडविण्यासह छ. शिवाजी महाराजांनी ज्या अठरा पगड जातींना स्वराज्यात सामावून घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केले, त्या सर्व समाजाच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमी उभा राहिला असून समाजातील त्या सर्व घटकांना विकासात सामावून घेण्याचे काम पक्षाने केले आहे. विकासाच्या बाबतीत रायगड कुठेही कमी पडणार नसून नागोठणे परिसरालाही जामनगर सारखे करण्यासाठी, येथे रोजगार निर्मिती करण्यासाठी मी स्वतः अंबानीजवळ बोलेन, असे ठोस आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी नागोठणेकरांना दिले.
नागोठण्यातील आठवडा बाजार मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीर मेळावा व प्रवेश सोहळा सोमवारी (दि.5) पार पडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले किशोर जैन यांच्या भाषणातील रिलायन्सच्या विस्तारित प्रकल्पाच्या मुद्द्याचा धागा पकडून अजित पवार यांनी नागोठण्याप्रती आपली भूमिका स्पष्ट केली.
यावेळी राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे, राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, मा.आ. अनिकेत तटकरे, मुख्य प्रवेशकर्ते किशोर जैन, प्रदेश उपाध्यक्ष मधुकर पाटील, प्रदेश सरचिटणीस विजयराव मोरे, प्रवक्ते ॲड. राजीव साबळे, जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, कार्याध्यक्ष सुभाष केकाणे, माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप, तालुकाध्यक्ष विनोद पाशिलकर, सरचिटणीस सुरेश मगर यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
प्रशासकीय इमारतीचे भूमीपूजन
नगरपंचायतीची प्रस्तावित प्रशासकीय इमारत ही तळा शहराच्या वैभवात भर घालणारी, दर्जेदार आणि भविष्याचा विचार करून उभारण्यात येईल. तसेच, या प्रशासकीय इमारतीमुळे नागरिकांना एकाच छताखाली विविध सेवा-सुविधा उपलब्ध होणार असून प्रशासन अधिक गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख होणार आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. नागरी सेवा व सुविधा योजनेअंतर्गत तळा नगरपंचायतीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचा भूमिपूजन सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते तळा येथे संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मंत्री अदिती तटकरे, खा. सुनील तटकरे, मा. आ. अनिकेत तटकरे, नगराध्यक्ष माधुरी घोलप, उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे, नगरपंचायत सदस्य-सदस्या, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल आदी मान्यवर उपस्थित होते.
