। नागोठणे । प्रतिनिधी ।
नागोठणे पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर गावठी दारूविरोधात आक्रमक मोहीम राबविणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलिसांनी आणखी एक मोठी कारवाई केली आहे.
रविवारी (दि. 14) सकाळी नागोठण्याजवळील वाघ्रणवाडी आदिवासी वाडीच्या जंगल परिसरात सुरू असलेली गावठी दारू निर्मितीची हातभट्टी पोलिसांनी उद्ध्वस्त केली. धाडीदरम्यान 8 प्लास्टिक बॅरलमध्ये प्रत्येकी 200 लिटर याप्रमाणे 1600 लिटर गुळमिश्रित रसायन आढळून आले. हा माल वाहतुकीस अवघड असल्याने पोलिसांनी तो जागीच नष्ट केला. तसेच 7 ट्यूबमध्ये प्रत्येकी 20 लिटर प्रमाणे तयार गावठी दारू जप्त करण्यात आली. या कारवाईत एकूण 22 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी उत्तम शिद रा. वाघ्रणवाडी, ता. रोहा हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रमेश सोनकर, पोलीस शिपाई गणेश चोरगे, पोलीस शिपाई शिवदास धुळगंडे व पंच यांच्या पथकाने केली. दरम्यान, नागोठणे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगल भागात गावठी दारूच्या भट्ट्यांचा ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून शोध घेऊन ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे स.पो.नि. सचिन कुलकर्णी यांनी सांगितले.
नागोठणे पोलिसांची गावठी दारूच्या हातभट्टीवर धडक कारवाई
