घरफोडीतील आरोपीच्या मुसक्या आवळल्या
| नागोठणे | प्रतिनिधी |
नागोठणे शहरामध्ये गेल्या काही दिवसांत घडफोडीच्या घटना घडल्या आहेत. या घरफोडी संदर्भात तपासाची चक्रे वेगाने फिरवून याप्रकरणी एका आरोपीच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण व नागोठणे पोलिसांना यश आले आहे. पोलिसांच्या या दमदार कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून, या आरोपीला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे त्याच्याकडून नागोठण्यातील घरफोडीच्या गुन्ह्यातील इतर आरोपींची नावे समजण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
नागोठणे पोलीस ठाण्यात दि.2 व 3 डिसेंबर रोजी घरफोडीचे दोन गुन्हे दाखल झाले होते. याबाबत पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांचे तात्काळ कारवाईचे आदेश अलिबाग येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व नागोठण्याचे प्रभारी अधिकारी यांना देण्यात आले होते. त्यानुसार रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व नागोठणे पोलीस ठाणे यांनी संयुक्तरीत्या या गुन्ह्यातील आरोपींचा तांत्रिक विश्लेषण व वैज्ञानिक धागेद्वारे तपास केला. त्यानुसार मध्यप्रदेश येथील कुलदीप राधेश्याम डोडवे (22) या आरोपीला तेथून सापळा रुचून दि.31 डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास अटक करण्यात आली. त्यानंतर कुलदीप याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने हे दोन्ही गुन्हे केल्याची कबुली दिलेली आहे. या दोन्ही गुन्ह्यांचा पुढील तपास नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलीस करीत आहेत.







