नागोठणे तासनतास वीज गायब

| नागोठणे | प्रतिनिधी |

नागोठणे शहर व ग्रामीण विभागात महावितरणने सध्या कडक उन्हाळ्यातही खेळ मांडला असून सध्या वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. याचा नाहक त्रास नागरिकांना सोसावा लागत आहे.

वीज खंडित होण्याची कोणतीच ठराविक वेळ नसून रात्री बेरात्री, तर दिवसा कधीही अर्ध्या, एका तासाच्या अंतराने वीज खंडित होत आहे. कधी पाच मिनिटे तर कधी अर्धा किंवा एक-एक दोन-दोन तास वीजपुरवठा खंडित होत आहे. तसेच विजेच्या शटडाऊनची माहिती जाबाबदार अधिकाऱ्यांकडून येत नसल्याने नागरिकांत संभ्रम निर्माण झाला आहे. तसेच कडक उन्हाळ्यात वारंवार वीज खंडित होऊनही वीज ग्राहक असलेले नागरिक मात्र शांत शांत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

महावितरणच्या या गलथान कारभाराने जणू काही शहरात अघोषित लोडशेडिंग करण्यात येत असल्याचा प्रत्ययच नागरिकांना येत आहे. मागील काही दिवसांपासून तर नागोठणे शहरात विद्युत पुरवठा खंडित होणे, विद्युत दाब अचानक कमी जास्त होणे यासारखे प्रकार नेहमीचेच झाले आहेत. वेळी अवेळी वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे याचा विपरित परिणाम विजेवर चालणाऱ्या उपकरणावर होत आहे.

Exit mobile version